देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? अंगावर याल तर शिंगावर घेण्याचा चंद्रकांत पाटील यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? त्यांनी आरक्षण दिलं ही चूक झाली का? असा सवाल भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला.

सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगली शहरातील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर होते.

सांगलीत निघालेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला’ भाजप इशारा सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले या सभेत प्रचंड मोठा रावण जाळणार आहे. राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर आता 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपची सभा होणार असून त्या सभेत मी सविस्तर बोलणार असल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांच्यावर टीका करत आहे. याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले, अरे गोपीचंद, राजारामबापू पाटील यांच्यावर बोलायची गरज नाही, त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा. जयंत पाटील यांना सांगली जिल्हा बँकेची आठवण असेल. ऑनलाइन लॉटरी घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी लागेल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागलीच पाहिजे, नोकरभरती चौकशी झालीच पाहिजे, सर्वोदय कारखाना कुणी लाटला? आता सोडणार नाही.

पेशवाई, एकादशीला मटण वक्तव्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राजाराम बापू पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना आम्ही समज देऊ, पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि कुटुंबावर खालच्या शब्दात टीका का केली गेली? पडळकर यांनी जे वाक्य म्हटलं त्याला आमचं नेतृत्व खंबीर आहे, पण मिटकरीचे कान कुणी पकडले का? गोपीचंद पडळकर याना समज देऊ, तुम्ही घाबरता म्हणून एकत्र येऊन टीका करता. भाजप कार्यकर्त्यांनी कुणी अंगावर याल तर शिंगावर घ्या, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. राज्यात जातीयवाद कुणी निर्माण केली? संभाजीराजे यांना मोदींनी खासदार केलं. वाटेल ते बोललं, तर सहन करणार नाही.

We’ll Take You Head-On,” Warns Chandrakant Patil

महत्वाच्या बातम्या