विशेष प्रतिनिधी
पुणे : Laxman Haake : ओबीसी आरक्षणासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर शनिवारी (ता. २७ सप्टेंबर २०२५) अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बायपास रस्त्यावर ही घटना घडली. हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना हा हल्ला झाला. सकाळी अहमदनगरजवळ नाश्त्यासाठी थांबल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू करताच काही तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून काठ्या आणि बांबूंनी हल्ला चढवला. यात गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आणि मोठे नुकसान झाले. सुदैवाने हाके यांना कोणतीही शारीरिक दुखापत झाली नाही, परंतु त्यांच्या एका सहकाऱ्याला गंभीर जखम झाली असून त्याच्या हात-पायांना फ्रॅक्चर आणि डोक्याला टाके पडले आहेत.
लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “हल्लेखोरांपैकी एक असलेला दळवी आणि त्याचे सहकारी यांचे फोटो शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबत दिसत आहेत. या हल्ल्यामागे जाणीवपूर्वक कट रचला गेला आहे. पवार कुटुंबाने अशा गुंडांना पोसले आहे, ज्यांनी माझ्यावर हा हल्ला केला. माझ्यावर आतापर्यंत ८ ते ९ हल्ले झाले, पण हल्लेखोरांवर कधीच कठोर कारवाई झाली नाही. जर कारवाई झाली असती, तर मला आज पोलिस संरक्षणाची गरजच पडली नसती. पोलिसांचे संरक्षण असतानाही हल्ला होत असेल, तर यांना कायद्याची भीतीच नाही. हल्लेखोरांना माहिती आहे की, हल्ला केल्यानंतर काहीच होणार नाही.”
हाके पुढे म्हणाले, “हल्लेखोरांचा दावा आहे की, मी अंतर्गत विवाहाबाबत बोललो म्हणून माझ्यावर हल्ला केला. पण यांना छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास माहितीच नाही. शाहू महाराजांनी शंभरहून अधिक आंतरजातीय विवाह घडवून आणले होते. यांना शाहू महाराज समजायला त्यांच्या पुढच्या शंभर पिढ्यांचा काळ लागेल. पवार कुटुंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचे काम केले आहे. सहकारी संस्था त्यांच्या नावावर केल्या आणि महाराष्ट्रात पाहुण्या रावळ्यांचे राज्य आणले. आजही ५० ते ६० टक्के ओबीसी समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे आणि सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी हाके पाथर्डीकडे निघाले असताना अहमदनगर बायपास रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करताच १० ते १२ हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर बांबू आणि काठ्यांनी हल्ला केला. हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत हाके यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या प्रकरणी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून, नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हल्ल्याच्या एक दिवस आधी हाके यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी आपले शत्रू वाढत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अवघ्या २४ तासांत हा हल्ला घडल्याने खळबळ उडाली आहे. हाके म्हणाले, “हल्लेखोरांनी २ ते ३ फूट लांबीचे बांबू वापरले. पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असतानाही त्यांनी बेछूट प्रहार केले. जर पोलिसांनी १० सेकंद उशीर केला असता, तर बांबू थेट माझ्या डोक्यात बसले असते.”
या घटनेने ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे, तर हाकेंच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
Laxman Haake makes serious allegations of hooliganism against the Pawar family
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…