पुराचे पाणी हटले नसल्याने पंचनामे रखडणार, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली भीती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतातील पुराचे पाणी अद्याप हटले नाही. त्यामुळे तिथे लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई देखील रखडण्याची भीती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे. पण राज्याचे पंचनामेच झाले नाहीत तर नुकसान भरपाई देणार कशी असा प्रश्न निर्माण हाेत आहे.
पत्रकारांशी बाेलताना गिरीश महाजन म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पाणी आहे. शेतातही पाणी आहे. त्यामुळे आता लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलिस व कृषि विभाग या प्रकरणी 24 तास काम करत होते. हे अधिकारी रात्रंदिवस रस्त्यावर होते. पण आजपासून थोडे विश्रांती मिळाली आहे. तरीही ते सकाळपासूनच कामाला लागले आहे. पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा आढावा घेता येत नाही. नेमका आकडा कळत नाही. पण निश्चित आत्ता हे आकडे येतील. त्यानंतर किती नुकसान झालंय, किती शेतकऱ्यांना द्यायचे आहे. तो आकडा पाहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री केंद्राकडे राज्याचा मदतीचा प्रस्ताव पाठवतील.

पीकविम्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले, पीक विम्याच्या बाबतीत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. पीक विमा चालूच आहे. पण काही सुधारित योजना आणता येईल काय? शेतकऱ्यांना त्यातून काही कायमस्वरुपी दिलासा मिळणार आहे का? हा विषय मंत्रिमंडळाचा आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील.


 


गिरीश महाजन यांनी यावेळी मुस्लिम समाजाला एकजुटीने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचा हटवण्याचे आवाहन करणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला. महाजन यांनी त्यांच्या या आवाहनाची खिल्ली उडवत त्यांनी कितीही आवाहने केली लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचवरच असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्या आवाहनामुळे काहीही फरक पडणार नसल्याचा दावाही केला.

गिरीश महाजन यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मुद्यावरून राज व उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. आमची तयारी अतिशय जोरात आहे. आम्हाला कुठलाही फरक पडत नाही. राजकारण जर-तर वर चालत नाही. एकत्र आले तर काय होईल? येतील तेव्हा बघू. पण भाजप व महायुतीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईत काहीही केले तर लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे. फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांवर आहे. त्यामुळे मला असे वाटते की, या प्रकरणी कुणी काहीही म्हटले तरी काहीही गर्जना केल्या तरी दोन महिन्यांत दुध का दुध पाणी का पाणी होईल, असे महाजन म्हणाले.

अहिल्यानगर हिंसाचारावर गिरीश महाजन म्हणाले, कुणीही लोकांना भडकावण्याचे काम करू नये. जाणिवपूर्वक कुठेतरी हिंसा झाली पाहिजे, समाजासमाजात जातीय तणाव झाला पाहिजे, अशी काही लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे ते या प्रकरणी प्रक्षोभक विधाने करत आहेत. पण इथे काहीही फरक पडणार नाही. काडीचाही फरक पडणार नाही.

Girish Mahajan expressed fear that Panchnama will be delayed as flood waters have not receded

महत्वाच्या बातम्या