विशेष प्रतिनिधी
धाराशिव : Dharashiv महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सगळ्यात जास्त परिणाम हा शेतीवर होत आहे. विशेषतः मराठवाडा परिसरात अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतजमिनी देखील वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसान भरपाई देण्याची राज्यभरातून मागणी होत आहे.
अशा वेळी शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित असताना बँकांकडून मात्र कर्ज वसुलीच्या नोटिसा लावला जात असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडले आहेत. संचितपूर गावातील २७ शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ‘आम्ही आधीच पिकांच्या शंभर टक्के नुकसानीमुळे आर्थिक संकटात आहोत. पिके गेल्याने आमच्या हाती काहीच उरलेले नाही, अशा स्थितीत बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटिसा येणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आम्ही पैसे कुठून भरायचे? भाजपा सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण आता प्रत्यक्षात मात्र आम्ही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहोत.’ Dharashiv
‘शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, हे लक्षात घेऊन शासनाने तातडीने कर्जमाफी जाहीर करणे गरजेचे आहे. नोटिसा गोळा करून मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने पाठवणार’, असे शेतकरी म्हणाले.
या पार्शवभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच संकट कोसळलेले असताना बँकांकडून नोटिसा पाठवणे म्हणजे निर्दयी वागणूक आहे. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून या नोटिसा थांबवायला हव्यात. शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेत आहेत, पण उलट त्यांच्यावर सक्तीची वसुली केली जात आहे. उद्धव ठाकरे जेव्हा धाराशिव दौऱ्यावर आले होते, तेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांना या नोटिसा दाखवल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नोटिसा गोळा करण्याचे आदेश दिले होते. आम्ही आता त्या नोटिसा गोळा करून मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने पाठवणार आहोत, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव होईल.’ Dharashiv
शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेल्या या नोटीसांमुळे राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली जात आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीकं, जनावरं तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांना बँकेकडून सक्तीच्या वसुलीचा नोटिसा येत आहेत.
मात्र, याविषयी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. त्यानंतर आम्हाला दिलासा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. Dharashiv