विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis : राज्यात अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रूपये वितरित करणे सुरू केले आहे. नुकसानीबाबत सामुहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू. ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काही महिन्यात सातत्याने महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला. जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले त्यासाठी २ हजार २१५ कोटी रूपये राज्य सरकारने वितरीत करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट रद्द करून शेत नोंदीप्रमाणेच ही मदत होईल. पुढच्या २-३ दिवसांत सगळ्या प्रकारची माहिती आमच्याकडे पोहचेल. काही ठिकाणी पाणी असल्याने योग्य आकडेवारी घेता येत नव्हती. तिथे आपण अधिकचा वेळ दिला आहे. २-३ दिवसांत ही माहिती पोहचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत, जमीन खरडून गेलेली असेल त्याकरता मदत, विहिरींसाठी मदत, घरांची मदत असेल अशा वेगवेगळ्या नुकसानीबाबत सर्वसमावेशक धोरण आखून आम्ही मदत करणार आहोत.
मुख्यमंत्री म्हणाले, सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी खात्यात मिळाली पाहिजे असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होते. परंतु धोरणात कुठेही ओला दुष्काळाचा उल्लेख नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र ज्या वेळी दुष्काळ पडतो तेव्हा ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. नुकसानाची आकडेवारी जमा झाल्यानंतर लवकरात लवकर याबाबत मदतीची घोषणा करू.
दरम्यान, दिल्लीतून आपल्याला पूर्ण मदत होणार आहे. त्यासाठी आपला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. परंतु दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता लागेल ती मदत आपण देतोय. त्याची भरपाई दिल्लीतून नंतर केली जाईल. केंद्राला एक प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर एक प्रस्ताव पाठवला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Chief Minister Devendra Fadnavis’s relief to those affected by heavy rains, aid directly to farmers’ accounts before Diwali
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!