विशेष प्रतिनिधी
पुणे : Asaduddin Owaisi : येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र, नेहमीप्रमाणेच काँग्रेस या वेळीही ‘वरात मागून घोडे’ अशा स्थितीत दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष खडबडून जागे झाले असताना, काँग्रेस मात्र अजूनही साखरझोपेतून बाहेर येताना दिसत नाही. अशातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सक्रिय सहभागामुळे काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजू शकते, असे बोलले जात आहे.
काँग्रेसला नेहमीच मुस्लिम धार्जिणा पक्ष म्हणून हिणवले जाते. काँग्रेसची मदार प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम मतांवर अवलंबून आहे. मुस्लिम मतदारांना काँग्रेसची व्होट बँक म्हणून पाहिले जाते. 2014 च्या निवडणुकांपर्यंत काँग्रेसची व्होट बँक असलेला मुस्लिम मतदार काँग्रेससोबत होता. परंतु, स्थानिक पक्षांच्या उदयामुळे काँग्रेसच्या व्होट बँकेत अनेक वाटेकरी निर्माण झाले आणि काँग्रेसला धक्के बसू लागले. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, आणि एआयएमआयएम (AIMIM) यांसारख्या पक्षांच्या उदयामुळे काँग्रेसची दलित आणि मुस्लिम मतदारांची पाठराखण कमी झाली. याचा परिणाम निवडणुकांमधील काँग्रेसच्या अपयशातून स्पष्ट दिसून आला. याच काळात, भाजपने हिंदुत्ववादाची मोट बांधत ओबीसी आणि उच्चवर्णीय अशी मजबूत व्होट बँक तयार केली. याच्या जोरावर भाजपने 2014 नंतरच्या बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेसला धूळ चारली.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपने तर आव्हान दिलेच, परंतु वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्यामुळेही काँग्रेसला फटका बसला. वंचित बहुजन आघाडीच्या उदयामुळे दलित वर्ग काँग्रेसपासून दूर गेला. एआयएमआयएम पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात ग्रामीण भागापर्यंत जरी मर्यादित असला, तरी शहरी भागात आणि विशेषत: युवकांमध्ये त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. असदुद्दीन ओवैसी यांच्या आक्रमक धोरणांमुळे पक्षाच्या वाढीला वाव मिळत आहे. “काँग्रेसने मुस्लिमांसाठी काहीही केले नाही” ही भावना निर्माण करण्यात ओवैसी यांना यश मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात अनेक भागांत मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. सध्याच्या स्थितीत या मुस्लिम बहुल भागांत काँग्रेसची स्थिती चांगली आहे. एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्रात सध्या दोन आमदार आहेत. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, सोलापूर, नांदेड, तसेच काही प्रमाणात पुणे आणि मुंबई या भागांत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतांच्या जोरावर आता ओवैसी यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री करायची आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी असदुद्दीन ओवैसी तयारीला लागले आहेत. त्यांनी नुकताच कोल्हापूरचा दौरा केला. इचलकरंजी येथील त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ते सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही जाणार आहेत. त्यांच्या या सक्रियतेमुळे शहरी भागातील मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. ध्रुवीकरणाचे राजकारण हे एआयएमआयएम आणि भाजप दोन्हींसाठी पोषक आहे. जर ध्रुवीकरणाचे राजकारण झाले, तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
आता असदुद्दीन ओवैसी यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील एंट्री यशस्वी ठरते की भारत राष्ट्र समिती (बीआरएस) प्रमाणे अपयशी ठरते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
Owaisi will put a damper on Congress in the ‘ZP’-municipal elections!
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!