विशेष प्रतिनिधी
मुंबई : सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही घटकपक्षांमध्ये सध्या हाणामाऱ्या सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यामुळे भाजपचा ॲॅनाकोंडा या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महायुतीवर निशाणा साधला.
पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सध्या निवडणुकीचा सीजन सुरू आहे. त्यात गडबड घोटाळेही सुरू आहेत. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांचा वाईट अनुभव येत आहे. सुप्रीम कोर्टाने नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका, पालिका निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. पण अजूनही मुंबई व इतर शहरातील मतदारयाद्यांत जो प्रचंड घोळ आहे, त्यावर कुणीच बोलत नाहीत. याची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली पाहिजे.
सुप्रीम कोर्ट भटक्या कुत्र्यांसह इतर प्रकरणांत स्वतःहून लक्ष घालते. पण हा लोकशाहीचा विषय आहे. त्यामु्ळे कोर्टाने स्वतःहून त्यात लक्ष घातले पाहिजे. मतदारयाद्यांतील घोळाविषयी आपण काय करत आहात? हा घोळ निकाली निघत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती आम्ही कोर्टाकडे केली पाहिजे., असे ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या मारामाऱ्या सुरू आहेत. आतापर्यंत असे प्रकार आपण दुसऱ्या राज्यांतच पाहत होतो. तिकडे बंदुका निघत होत्या. मारामाऱ्या होत होत्या. आता बूथ कॅप्चरिंगऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा जनतेच्या हिताचा नाही. स्वतःची पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची घरे भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशावेळी आपल्यासारख्या सुजान नागरीक शिवसेनेकडे येत आहेत. कारण, जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसत आहे, जिच्या हातात मशाल आहे.
विरोधी पक्षनेतेपद व उपमुख्यमंत्रीपद या दोन गोष्टी आहेत. कारण, विरोधी पक्षनेतेपद हे सरकारने द्यायलाच हवे. आम्ही पहिल्याच अधिवेशनात तशी मागणी केली होती. एक वर्ष होऊन गेले. त्यात सरकारने जाहिरातींशिवाय दुसरे काहीच केले नाही. कदाचित विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला वर्षभर विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ असावी. हे सरकार विरोधी पक्षनेतेपदाला का घाबरत आहे? हे अत्यंत मजबूत सरकार आहे. त्यांना दिल्लीचाही पाठिंबा आहे. त्यांनी अनेक भ्रष्टाचाऱ्यांनाही सोबत घेतले आहे. त्यांच्यावर त्यांनी पांघरूनही घातले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
हे सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरत आहे असा आमचा प्रश्न आहे. त्यांनी ताबडतोब दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते जाहीर केले पाहिजेत. या प्रकरणी सरकार आम्हाला कायदे दाखवत असेल, तर त्याने सर्वप्रथम उपमुख्यमंत्रीपद रद्द केले पाहिजे. कारण, या पदाची संविधानात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती खाती आहेत ते पाहा, त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्यायच्या की बाथरूमच्या द्यायच्या ते द्या. त्यांनी उपमुख्यमंत्री हे बिरुद लावता कामा नये. कायद्यानुसार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारने दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद जाहीर केले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला केंद्रीय कृषिमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की, त्यांनी यांचे सोंग व ढोंग उघडले पाडलेत. त्यांचेच दात त्यांनी त्यांच्या घशात घातलेत. साधारणतः सप्टेंबरपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकट आले. त्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करण्याची गरज होती. पण ओला दुष्काळ ही संज्ञा नाही म्हणून तुम्ही ते संकट टाळू शकत नाही.
सरकारने या प्रकरणी जाहीर केलेल्या पॅकेजचा पत्ता नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा पत्ता नाही. त्यानंतर या सरकारने केंद्राकडे अतिवृष्टीचा प्रस्तावच पाठवला नाही. आता प्रस्ताव मिळालाच नाही असे समजल्यानंतर सरकारने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रस्ताव पाठवला. आता त्यावर अभ्यास केव्हा होणार, केंद्राची समिती केव्हा येणार. मग तेथील तिजोरीची चावी कुणाकडे आहे, त्या तिजोरीतून राज्याच्या तिजोरीत पैसा केव्हा येणार, त्यानंतर त्या तिजोरीतून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जाणार यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
“BJP’s Anaconda Will Swallow Ajit Pawar and Shinde Faction Too, Says Uddhav Thackeray”
महत्वाच्या बातम्या