सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केवळ ६८ शब्दांत, विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर जोरदार प्रहार करत संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख फक्त ६८ शब्दांमध्ये आटोपला जाणे ही महाराष्ट्रातील जनतेचा आणि देशातील अभ्यासकांचा अपमान आहे.

तांबे म्हणाले की, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा इतिहास देशपातळीवर पोहोचू शकत नसेल, तर हे शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. शिवरायांच्या तुलनेत इतर राज्यांबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे, हे अत्यंत खेदजनक आहे.” त्यांनी स्पष्ट केले की या विषयावर चर्चा सुरू करण्यासाठी वारंवार सभागृहाचे दार ठोठवावे लागते, ही शालेय शिक्षण विभागाची गंभीर चूक आहे.



तांबे यांनी ठामपणे म्हटले की, “जर सीबीएसई फक्त ६८ शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असेल, तर महाराष्ट्र सरकारने शांत बसू नये. राज्य सरकारने स्वतःचा अभ्यासक्रम तयार करून सीबीएसईला द्यायला हवा होता आणि सांगायला हवे होते की शिवरायांचा संपूर्ण इतिहास समाविष्ट करा.”

त्यांच्या वक्तव्याने सभागृहात क्षणभर तणाव निर्माण झाला, तर सोशल मीडियावर देखील या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.

Satyajit Tambe’s anger in Legislative Council

महत्वाच्या बातम्या