काँग्रेसने कितीही राजकारण केले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, संजय राऊत यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई: काँग्रेसने कितीही राजकारण केले तरी वेगळा विदर्भ होणार नाही. वडेट्टीवार किंवा काँग्रेसच्या भूमिकेला फारसं महत्त्व देत नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे. मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. Sanjay Raut

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर काँग्रेसमधील नेत्यांची भूमिका समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे समोर आल्यानंतर राऊतांनी यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचे त्यांनी आठवण करून दिली. मात्र महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाची सहमती असल्याचा दावा केला. आता ठाकरे बंधू मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कुणी वेगळ्या विदर्भाचे स्वप्न पाहात असेल तर त्यांचे स्वप्न भंग होईल

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सांगितले की, राज्याच्या कॅबिनेटमधील एक महत्त्वाचा मंत्री खुलेआम महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करत आहे आणि मुख्यमंत्री त्यावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे गटाचा एकही आमदार बोलत नाही, यावरूनच सर्व चित्र स्पष्ट होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यांनी शिंदे गटावर अमित शाहांचे मिंधे असा आरोप करत, स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे सत्तेत असूनही बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे गप्प बसल्याची टीका केली. महाराष्ट्र तोडण्याच्या अजेंड्यावर अमित शाह यांचा छुपा डाव असल्याचा आरोप करत, मुंबई आणि विदर्भ वेगळे करण्याच्या कटाला सत्ताधाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा दावा राऊत यांनी केला.



यावेळी संजय राऊत यांनी पालघर जिल्ह्याचा मुद्दा उपस्थित करत गुजरातकडून होणाऱ्या कथित घुसखोरीवरही गंभीर आरोप केले. पालघरमधील बहुतांश ठेकेदार गुजराती असल्याचा दावा करत, हा प्रभाव भविष्यात आणखी वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात गुजरातने डांग, उंबरगाव, डहाणू आणि पालघरवर दावा सांगितल्याची आठवण करून देत, हा भाग अजूनही त्यांच्या अजेंड्यावर असल्याचे राऊत म्हणाले. बुलेट ट्रेनचा मार्ग पालघरमधून नेण्यामागेही हाच हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगत, महाराष्ट्र म्हणजे फडणवीस सरकार नाही, असा बोचरा टोला त्यांनी लगावला.

महायुती सरकारकडून अद्याप विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती न केल्याबाबत संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट हल्ला चढवत, राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर केंद्रात भाजपची धांदल उडाल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेत्याविना कामकाज पुढे रेटले जात असल्याचा अर्थ सत्ताधारी घाबरलेले आहेत, असा आरोप करत अमित शाहांपासून सगळेच हादरले असल्याची टीका त्यांनी केली. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेता असणं ही केवळ परंपरा नसून संविधानाची गरज आहे, असे सांगत महाराष्ट्रासारख्या राज्यात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसणं ही गंभीर बाब असल्याचे राऊत म्हणाले.

गेल्या 11 वर्षांपासून विरोधी पक्षनेत्याचं अस्तित्वच नको, अशी भूमिका अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणातून पुढे आली असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 240 खासदार निवडून आल्याने विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही, असे ते म्हणाले. याचवेळी महाराष्ट्रात मुंबई आणि विदर्भ तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच वेगळ्या विदर्भाचा अजेंडा जाहीर केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या मुद्द्यावर शिंदे गटातील एकही आमदार आवाज उठवत नसल्याने ते अमित शाहांच्या दबावाखाली असल्याची टीका राऊत यांनी केली.

No matter how much politics Congress does, there will be no separate Vidarbha, says Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या