Devendra Fadnavis : पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

पुणे : Devendra Fadnavis  पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. प्रत्येक राज्याला एकच कृती इंजिन आहे, परंतु महाराष्ट्राला नवी मुंबई आणि पुणे अशी दोन ग्रोथ इंजिन आहेत. पुण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून शहराला शाश्वत, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्याचे प्रगतीपर्व या तीन हजार कोटींच्या विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे बोलत होते. Devendra Fadnavis

पुण्यात सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या ५० हून अधिक विकासकामांच्या ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहरी विकास व इतर खात्यांच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. Devendra Fadnavis



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यासाठी तीस ते पस्तीस हजार कोटींचा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. कोणतेही काम नियोजन करून केले पाहिजे . त्याला नियोजन नसेल तर केलेली कामे देखील पाडावी लागतात. त्यामुळे नियोजन करूनच मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. पुण्यात सर्वात मोठी वाहतुकीची समस्या आहे. बॉटल नेक मुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. यासाठी शहरात टनेल नेटवर्क डेव्हलप करणार आहे. रिंग रोड तयार करण्यात आले आहेत. दोनशे किलोमीटर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. ३२ मिसिंग लिंक रस्ते तयार करणे त्यामुळे ताशी स्पीड पाच ते दहा किलोमीटर वाढू शकते असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्याला शाश्वत शहर बनवण्यासाठी जायकाकडून २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एसटीपी शहरात मोठ्या प्रमाणावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे पाणी शुद्ध करून सिंचनाला वापरता येईल आणि धरणातील पाणी पिण्यासाठी वापरता येईल असे फडणवीस म्हणाले.

पुणे आणि मुंबई ही शहरे जगाला परिचित आहेत. आयटी, शिक्षण आणि उद्योग यांचे हे प्रमुख केंद्र आहे. आता केवळ कामासाठी नव्हे, तर उत्तम राहणीमानासाठी पुणे कसे आदर्श शहर बनेल, यावर भर दिला जात आहे. शहरातील सर्वात मोठा प्रश्न वाहतूक कोंडीचा असून, त्यावर महापालिका आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. रिंग रोड, मिसिंग लिंक, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, बॉटलनेक काढणे यामुळे वाहतूक सुलभ होईल. भविष्यात भुयारी मार्ग आणि बोगद्यांचा पर्यायही अभ्यासपूर्वक राबवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याच्या संदर्भात ते म्हणाले, लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज वाढणार आहे. नव्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणे मर्यादित असले, तरी शुद्धीकरण आणि पुनर्वापरावर भर दिला जाईल. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पूर्ण केली जाईल. एसटीपी प्रकल्पांचे जाळे उभारून पर्यावरणपूरक विकास साधला जाईल. पुण्याचा विकास करताना भविष्यातील गरजांचा विचार केला जात असून एआय, डेटा सेंट्रिक नियोजनावर भर देण्यात येत आहे. पुढील काळात पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे कॅपिटल बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून पुणे महापालिकाही त्याच वेगाने विकासकामे करत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याला प्राधान्य देण्यात येत आहे. पुणे हे आयटीचे मोठे केंद्र असून शहराचा संतुलित विकास साधणे आवश्यक आहे. नागरिकांचा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करून मोबिलिटी, पाणी व मूलभूत सुविधा सक्षम केल्या जातील. गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणावर नवीन विकासकामे सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, एकूण ५३ विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. पुणे मेट्रो, पोलीस ठाण्यांच्या नव्या इमारती यांचे लोकार्पण झाले असून यामुळे शहराच्या विकासाला दिशा आणि गती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत पुण्याचा आमूलाग्र बदल झाला आहे. कागदावर असलेली मेट्रो प्रत्यक्षात ३३ किलोमीटर धावू लागली असून पुढील टप्प्यात आणखी २३ किलोमीटरचे काम सुरू होईल. एकूण १०५ किलोमीटर मेट्रोचे जाळे उभे राहील. १५०० ई-बस रस्त्यावर धावतील. पुणे विमानतळाचा देशातील प्रमुख विमानतळांमध्ये सातवा क्रमांक असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय संपर्क आणखी वाढेल, असे त्यांनी सांगितले. दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे २६०० मेट्रिक टन कचर्‍यावर १०० टक्के प्रक्रिया केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पुणे हे विद्येचे माहेरघर असून लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पुढील ५० वर्षांत लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास जाऊ शकते. त्यामुळे पायाभूत सुविधा देणे अत्यावश्यक आहे. काही जुन्या आणि धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम करावे लागणार आहे. वाहतूक, पाणी आणि पर्यावरण या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. प्रशासकांच्या काळानंतर आता निवडून आलेले नगरसेवक आल्यावर मोठी कामे वेगाने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात होणारी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुण्याची संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी देईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळ देईल, असेही त्यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्त आणि सुरक्षिततेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यासाठी आवश्यक तेवढी पोलिससंख्या मंजूर करण्यात आली आहे. पुणे पोलिसांना सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पुरवले आहे, त्यामुळे आता पुणे शहरांमध्ये कोयता गॅंग दिसता कामा नये. गुन्हेगारी, कोयता गँगसारख्या प्रवृत्ती खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणावरही राजकीय दबाव नसेल. कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पुण्याच्या शाश्वत विकासासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणी आणि पर्यावरण या सर्व बाबींमध्ये दीर्घकालीन नियोजन करून पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

Pune Is Maharashtra’s Growth Engine, Says Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या