वंचितकडून मुंबईत काँग्रेसचा गेम, 16 जागांवर उमेदवारच नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महापालिका निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. त्यासाठी मुंबईत युती-आघाड्यांचे वेगवेगळी समिकरणे बनली. मात्र, अर्ज दाखल झाल्यानंतर अनेक गोंधळ समोर येत आहेत. यात मुंबईतील 16 जागांवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार न दिल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत वंचितने 62 जागा घेतल्या होत्या. मग अचानक 16 जागांवर उमेदवार न देण्याचे कारण काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, यातून सेटिंगचा वास येत असल्याची चर्चा काँग्रेसकडून केली जात आहे. Congress’ game

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. तिन्ही पक्षांनी अनेक चर्चांनंतर जागावाटपावर सहमती दर्शवली. यात काँग्रेसला 155, वंचित बहुजन आघाडीला 62 आणि राष्ट्रीय समाज पार्टीला (रासप) 10 जागा मिळाल्या. काल (30 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरले तेव्हा वंचितने त्यांच्याकडील 21 जागा आयत्यावेळी काँग्रेसला परत केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नियोजनाचा विचका झालाच शिवाय कार्यकर्त्यामध्येही चुकीचा मेसेज गेला.



वंचित बहुजन आघाडीने चर्चा करून मुंबईत 62 जागा घेतल्या तर त्यांनी उमेदवार उभे करणे गरजेचे होते. आयत्यावेळी उमेदवार नाहीत, हे कारण देत त्यांनी 21 जागा काँग्रेसला परत केल्या. ऐनवेळी काँग्रेसने 5 जागांवर त्यांचे उमेदवार दिले. मात्र, 16 जागांवर ना दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आलेले नाहीत. यावरून काँग्रेसला सेटिंगचा वास येत आहे. हट्टाने 62 जागा घेतल्यात तर उमेदवार देणे, ही जबाबदारी होती. मात्र, जाहीर घोषणा करूनही वंचितने उमेदवार न दिल्यामुळे 227 पैकी 16 जागांवर थेट दोन्ही पक्षांचा पराभव झाल्याचा आणि विरोधकांना त्यांनी चाल दिल्याचा मेसेज गेले आहे.

यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील चिडले आहे. वंचित बहुजन आघाडीने 62 जागा मागून 46 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर 16 जागांवर काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार नाहीत. याचा राजकारणात चुकीचा संदेश गेल्याची खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. शिवाय उमेदवार नाहीत तर 62 जागा का मागितल्या, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने प्रभाग 6, 11 ते 15, 21, 30, 46, 73, 80, 84, 85, 108, 117, 153, 177, 182, 195, 198, 207 या 21 जागा शेवटच्या क्षणी काँग्रेसला परत केल्या. तिकीटवाटप करताना काँग्रेसकडे इच्छुक उमेदवार असूनही त्यांना नाराज करावे लागले. आणि आयत्यावेळी जागा परत केल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नसल्याने काँग्रेस 31 पैकी केवळ 5 उमेदवारांना संधी देऊ शकला.

Congress’ game in Mumbai from the underprivileged, no candidate in 16 seats

महत्वाच्या बातम्या