विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ३ हजार ५२ उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या छाननीअंती १३१ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले असून २ हजार ३९७ अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयांत छाननीची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याने अंतिम आकडेवारी संकलनाचे काम रात्रीपर्यंत चालू होते.
महापालिकेच्या १६५ जागांसाठी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेत अनेक अर्जांवर हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी घेण्यात आल्याने काही ठिकाणी छाननीची कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अर्जांमधील त्रुटी, कागदपत्रांची पूर्तता, थकबाकी, नामनिर्देशनातील चुका यासारख्या कारणांवरून आक्षेप घेण्यात आले होते.
दरम्यान, काही प्रमुख उमेदवारांच्या अर्जांवर दाखल झालेले आक्षेप फेटाळण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर–जानवडी येथील भाजपच्या उमेदवार रेश्मा भोसले यांच्या अर्जावर ‘आप’कडून मालमत्तेवरील थकबाकीबाबत आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, हा आक्षेप छाननीदरम्यान फेटाळण्यात आल्याने भोसले यांची उमेदवारी कायम राहिली आहे. तसेच, प्रभाग क्रमांक ३६ धनकवडी–सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांच्या अर्जांवरील आक्षेपही फेटाळण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहता, येरवडा–कळस–धानोरी कार्यालयात एकूण २४८ अर्जांची छाननी झाली असून त्यापैकी २४६ वैध तर २ अर्ज अवैध ठरले. नगर रोड–वडगावशेरी येथे २४३ पैकी २०१ अर्ज वैध आणि ४२ अर्ज अवैध ठरले. कोथरूड–बावधन विभागात १७४ पैकी १५८ अर्ज वैध, १६ अर्ज अवैध ठरले. औंध–बाणेरमध्ये ११३ पैकी १०१ वैध तर १२ अवैध ठरले. शिवाजीनगर–घोले रोडमध्ये १५९ पैकी १५६ अर्ज वैध, ३ अवैध ठरले. ढोले–पाटील रोडमध्ये १२२ पैकी ११४ वैध आणि ८ अवैध ठरले.
हडपसर–मुंढवा आणि कसबा–विश्रामबाग वाडा या क्षेत्रीय कार्यालयांत छाननीची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. वानवडी–रामटेकडी येथे २६३ पैकी २६१ अर्ज वैध, २ अवैध ठरले. बिबवेवाडीत २३८ पैकी २३१ वैध आणि ७ अवैध अर्ज झाले. भवानी पेठेत २९४ पैकी २८० अर्ज वैध तर १४ अवैध ठरले. वारजे–कर्वेनगरमध्ये दाखल झालेल्या १७१ पैकी सर्व १७१ अर्ज वैध ठरले. सिंहगड रोडमध्ये १६७ पैकी १६२ वैध, ५ अवैध, तर धनकवडी–सहकारनगरमध्ये १४२ पैकी १३१ वैध आणि ११ अवैध अर्ज ठरले. कोंढवा–येवलेवाडी विभागात ९४ पैकी ८५ अर्ज वैध, ९ अर्ज अवैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना वैध उमेदवारांची संख्या मोठी असल्याने अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर ३ जानेवारीला अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणूक प्रचाराला अधिक वेग येणार आहे.
Scrutiny of 3,052 applications completed in Pune Mahanagarpalika
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत