पुण्यात महापालिका निवडणूक बहुरंगी; महायुती नसल्याने सर्वच पक्ष स्वबळावर

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत महायुती अस्तित्वात नसल्याचे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले असून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावरच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश प्रभागांत चौरंगी, तर काही ठिकाणी त्याहून अधिक रंगांची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढतील, अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने ही शक्यता फोल ठरली. शिंदे गटाने शंभराहून अधिक जागांवर उमेदवार उभे केले असून, भाजपने सर्वच्या सर्व १६५ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे भाजपने सुरुवातीपासूनच स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील जागावाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुटू शकला नाही. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले. जागावाटपाच्या सूत्रानुसार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुलनेने अधिक एबी फॉर्म वितरित झाल्याची चर्चा होती. अर्ज माघारीनंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ४४ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १२१ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

महाविकास आघाडीतही बिघाडीचे चित्र दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीत नसल्याने आघाडीचे गणित बिघडले आहे. याचा थेट परिणाम जागावाटप आणि उमेदवारीच्या एबी फॉर्म देण्याच्या प्रक्रियेवर झाला. सध्या महाविकास आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस हे दोनच पक्ष उरले आहेत.

ठाकरे गटासोबत आलेल्या मनसेनेही ४४ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग क्रमांक २३ मध्ये शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासमोर मनसेचे प्रल्हाद गवळी यांचे आव्हान असणार आहे. अनेक प्रभागांत मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही आमनेसामने येणार आहेत. मनसेकडून केवळ एका ठिकाणी उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने ७८ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, त्यामुळे त्यांच्या उमेदवारांचाही काँग्रेसच्या उमेदवारांशी थेट सामना होण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमुळे पुणे महापालिका निवडणूक अत्यंत बहुरंगी, चुरशीची आणि अनिश्चित निकालांची ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Pune Civic Polls Turn Multi-Cornered as Mahayuti Fails to Take Shape

महत्वाच्या बातम्या