शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती अखेर तुटल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. भाजपने शहरातील सर्व प्रभागांमध्ये एबी फॉर्मचे वाटप पूर्ण केले असून, शिवसेनेकडूनही सुमारे १५० ठिकाणी एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म वाटप झाल्याने उमेदवार माघार घेण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहेत्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

भाजप–शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत सुरू होती. दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यांत चर्चा झाल्या, मात्र ठोस तोडगा निघू शकला नाही. युती टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात एबी फॉर्मचे वाटप करून दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढतीचा निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अधिकृतपणे युती तुटल्याची घोषणा कोणीही करत नसले, तरी राजकीय वास्तव वेगळेच असल्याची चर्चा शहराच्या राजकारणात सुरू आहे. शिंदे गटाला भाजपने 15 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी संताप व्यक्त केला होता. बहुतांश ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तरीही मंत्री उदय सामंत यांनी युती होणारच असे सांगितले आहे.



भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, शिवसेनेला सन्मानजनक जागा देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. एबी फॉर्मचे वाटप झाल्यानंतर आता कोणताही उमेदवार माघार घेणार नाही, त्यामुळे युतीची शक्यता संपली आहे.

या विषयावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १०५ नगरसेवक होते, तरीही आम्ही युती करण्यास तयार होतो. शिवसेनेचे संख्याबळ कमी असतानाही ते अपेक्षेपेक्षा अधिक जागांची मागणी करत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये युती करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, मात्र जागावाटपावर मतभेद कायम राहिले. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पातळीवर गेला आहे. शिवसेनेने १५० एबी फॉर्म का दिले, हा प्रश्न मलाही पडला आहे. आम्ही शिवसेनेला १६ जागा देण्यास तयार होतो. काही जागांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो. तसेच रिपब्लिकन पक्षाला आम्ही आठ जागा सोडल्या आहेत.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते अद्याप युती टिकवण्याचे संकेत देत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत त्याला फारसे महत्त्व उरलेले नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पुण्यात एबी फॉर्म हिसकावून घेण्याच्या घटना, शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतरची तयारी पाहता माघारीची शक्यता जवळपास नाही. शिवसेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनीही आम्ही सर्व जागा लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट आणि कडवी होण्याची चिन्हे दिसत असून, याचा थेट परिणाम शहराच्या राजकीय समीकरणांवर होणार आहे.

150 AB Forms by Shinde Faction Signal BJP–Shiv Sena Split in Pune

महत्वाच्या बातम्या