CM Devendra Fadnavis : मुंबईत श्रेय लुटणारी टोळी सक्रिय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत सध्या श्रेय लुटणारी एक टोळी सक्रिय झाली असून काही अबोध बालकं सगळं आम्हीच केलं, असा दावा करत आहेत. मात्र मुंबईकरांना सत्य माहीत आहे,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केला.



मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप–महायुतीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मुंबईत आयोजित प्रचारसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून मुंबईचे भविष्य ठरवणारी आहे. महापालिका निवडणूक म्हणजे मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलण्याची निवडणूक आहे. मुंबईला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा हा निर्णयाचा क्षण आहे.
संक्रमणकाळात ‘राजकीय चमत्कार’ घडवण्याचे आवाहन
फडणवीस म्हणाले, “१४ आणि १५ जानेवारी हे संक्रमणाचे दिवस आहेत. या संक्रमणकाळात आपल्याला एक मोठा चमत्कार घडवायचा आहे. १६ जानेवारी रोजी धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्या दिवशी मुंबईत महायुतीचाच महापौर बसलेला असावा, ही आमची ठाम भूमिका आहे.”
मुंबई तोडण्याचा डाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उपरोधिक शैलीत टोला लगावला. ते म्हणाले, “मी आज मुंबईत सभा घेत घेत फिरलो. डोळे फाडून पाहिलं, मुंबई कुठे गेली आहे का? तुटली आहे का? सरकली आहे का? मला तर मुंबई तिथेच दिसली. पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. मुंबई कुठेही सरकत नाही, तुमची बुद्धी सरकली आहे.
“मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापाच्या बापात नाही,” असे सांगत फडणवीस म्हणाले, “आमच्यासोबत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे नेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे आहेत. रक्ताचा वारसा जन्माने मिळतो, पण विचारांचा वारसा कर्माने मिळतो. तो वारसा आज महायुतीकडे आहे.”
फडणवीस यांनी विकासकामांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप करत सांगितले, “मुंबईतील प्रत्येक मोठ्या विकासकामात खोडा कुणी घातला, हे मुंबईकरांना विचारा. ते एकच नाव सांगतील ते म्हणजे उद्धव ठाकरे. मुंबईकर आता जागा झाला आहे आणि विकासाचा धागा ओळखू लागला आहे.”
महापौरपदाच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडताना मुख्यमंत्री म्हणाले,“मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार. तो हिंदूच असेल आणि मराठीच असेल.”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “आमचा कुठल्याही धर्माशी वैर नाही. मात्र जे लोक महाराष्ट्रात आणि देशात ‘वंदे मातरम्’ म्हणायला नकार देतात, त्या मानसिकतेला आमचा ठाम विरोध आहे.”

Credit-Grabbing Gang Active in Mumbai,” CM Devendra Fadnavis Launches Sharp Attack on Thackeres

महत्वाच्या बातम्या