Amit Deshmukh : लातूरने राखली काँग्रेसची लाज, काँग्रेसचे स्वबळावर 47 जागा जिंकत वर्चस्व

विशेष प्रतिनिधी

लातूर : Amit Deshmukh राज्यभरात अनेक ठिकाणी काँग्रेसला धक्के बसत असताना लातूर महानगरपालिकेने काँग्रेसची राजकीय लाज वाचवली असल्याचं चित्र आहे. 70 जागांच्या लातूर महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर 47 जागा जिंकत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. याउलट भाजपला 22 मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं.Amit Deshmukh

भाजपच्या पराभवामागे प्रचारादरम्यान झालेला एक वादग्रस्त मुद्दा निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान लातूर शहरातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी शंभर टक्के पुसून टाकल्या पाहिजेत, असं विधान केलं होतं. हे वक्तव्य स्थानिक पातळीवर प्रचंड संतापाचं कारण ठरलं. विलासराव देशमुख हे लातूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांच्या स्मृतींबाबत केलेल्या या विधानाचा उलटा परिणाम भाजपला भोगावा लागला.Amit Deshmukh



वाद वाढल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मोठं योगदान दिलं असून आपण त्यांचा सन्मान करतो, असं स्पष्ट केलं. मात्र तोपर्यंत राजकीय नुकसान झालं होतं, असं निरीक्षकांचं मत आहे. या मुद्द्यावरून देशमुख कुटुंबीयांना नवसंजीवनी मिळाल्याचंही बोललं जात आहे. विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी लोकांच्या मनात कोरलेली नावं कधीच पुसली जाऊ शकत नाहीत असं सूचक विधान केलं होतं.

लातूरच्या निकालाकडे 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही पाहिलं जात आहे. त्या वेळी भाजप 36 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर काँग्रेसला 33 जागा मिळाल्या होत्या. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली होती. त्यानंतर अर्धा कार्यकाळ भाजपकडे महापौरपद राहिलं, तर उर्वरित काळात काँग्रेसला संधी मिळाली. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेत भाजपला पिछाडीवर टाकलं आहे, हे चित्र पूर्णपणे वेगळं आहे.

लातूरच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचा प्रभाव आजही कायम आहे. विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या तीन पुत्रांपैकी अमित देशमुख हे सध्या लातूर सिटीचे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तर अमित देशमुख विजयी झाले होते. लातूर लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसचं वर्चस्व असून शिवाजी कलगे हे येथून खासदार आहेत. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम महानगरपालिका निवडणुकीत दिसून आला.

Latur Saves Congress’s Honour, Party Wins 47 Seats on Its Own

महत्वाच्या बातम्या