‘डॅडीं’चा बालेकिल्ला दगडी चाळीत दोन्ही लेकींचा पराभव; वहिनीही पराभूत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी अनेक प्रस्थापित राजकीय गणिते कोलमडून टाकली असून, भायखळा आणि दगडी चाळ परिसरातून आलेला निकाल विशेष लक्ष वेधून घेत आहे. कुख्यात गँगस्टार अरुण गवळी यांचा प्रभाव असलेल्या दगडी चाळ परिसरातच गवळी कुटुंबाला मतदारांनी नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या अरुण गवळी यांच्या दोन्ही मुलींना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी या वॉर्ड क्रमांक 212 मधून निवडणूक रिंगणात उभ्या होत्या. यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेल्या गीता गवळी यांना यावेळी मात्र मतदारांचा पाठिंबा मिळू शकला नाही. तर दुसरी कन्या योगिता गवळी या वॉर्ड क्रमांक 207 मधून निवडणूक लढवत होत्या. दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी अरुण गवळींच्या दोन्ही मुलींचा पराभव केला आहे.

भायखळा परिसरातील दगडी चाळ हा अरुण गवळी यांचा प्रभावाचा भाग मानला जातो. अनेक वर्षे या भागात गवळी कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी वेगळा निर्णय देत, या कुटुंबालाच त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का दिला आहे.

केवळ गवळी यांच्या मुलीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही या निवडणुकीत अपयश आले आहे. अरुण गवळी यांच्या भावजय वंदना गवळी यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्या प्रभाग क्रमांक 198 मधून उमेदवार होत्या. मात्र, त्यांनाही विजय मिळवता आला नाही. ठाकरे गटाच्या उमेदवार अबोली खाडे यांनी त्यांचा पराभव केला.

गवळी कुटुंबातील तिन्ही उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे अखिल भारतीय सेनेसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, ज्या परिसरात गवळी कुटुंबाची पकड मजबूत मानली जात होती, तिथेच मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिल्याने या निकालाकडे राजकीय वर्तुळात लक्ष केंद्रीत झाले आहे.

Both daughters defeated in Dagdi Chawl

महत्वाच्या बातम्या