विशेष प्रतिनिधी
मुंबई: ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी ‘हास्यजत्रा’ आहे,” असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
राऊत म्हणाले की, “आमदारांना घेऊन ते सुरतला सुरक्षित ठिकाणी गेले होते. मग नगरसेवकांनाही सुरत किंवा अहमदाबादला न्यायला हवे होते. त्यांना मुंबईतच का कोंडून ठेवले आहे? स्वतःच्या राज्यात उपमुख्यमंत्री असतानाही जर नगरसेवक पळवले जातील किंवा त्यांचे अपहरण होईल अशी भीती वाटत असेल,तर ही महाराष्ट्राच्या राजकारणीतील फार मोठी हास्यजत्रा आहे. तुम्ही या नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? हे नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात आजही मराठी अस्मितेची मशाल धगधगत आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळजवळ सर्वांनीच ठरवले आहे. येणाऱ्या काळात काय होते ते बघुयात.”
संजय राऊत म्हणाले, शिंदे गटातील निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये बरेच नवीन चेहरे आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. शिवसैनिकाच्या मनात मुंबईबद्दल वेगळी भावना आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होऊ देऊ नये, असे सगळ्यांच्या मनात विचार असल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे. तुम्हीही कितीही कोंडून ठेवले, तरी संपर्काची अनेक साधने असतात, त्यानुसार संदेश येतच असतात.
मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधुंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल, शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. काल मी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही भावांमध्ये मोबाईलवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut Jabs Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान