पराभव वेदनादायक, पण अंतिम नाही, सोलापूर महापालिकेत दारुण पराभवानंतर प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना पत्र

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्या रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष आणि लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही, याची खंत आहे. हा पराभव वेदनादायक असला तरी अंतिम नाही, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. Praniti Shinde

सोलापूर महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत, हे मान्य करत प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांसाठी खुले पत्र लिहिले आहे. बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही लढत झाल्याचे सांगितले. “तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो आणि सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो,” असे त्यांनी म्हटले आहे.

राजकारणात जय पराजय येत जात असतात. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी आहे. तुम्ही ज्या जिद्दीने आणि न डगमगता काम केले, ते कुठेही हरलेले नाही. हा निकाल आत्मपरीक्षणाची संधी आहे. लोकांच्या अपेक्षा, प्रश्नांचा सूर आणि बदलते सामाजिक वास्तव अधिक खोलवर समजून घ्यायला हवे. सोलापूरचे हित हेच आपले ध्येय असले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना त्यांनी म्हटले, “आज थोडे थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ. ‘झुकना हमारी फितरत नहीं. दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने।’ तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम.”



दरम्यान, १०२ जागांच्या सोलापूर महापालिकेत भाजपाने ६३ जागा जिंकून स्पष्ट बहुमतापेक्षा पुढे मजल मारली आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसे आणि माकप यांनी एकत्र निवडणूक लढवली होती, मात्र या आघाडीचा शहरात अपेक्षित फायदा झाला नाही. निकालानुसार भाजप ६३, एमआयएम ८, शिवसेना शिंदे १ आणि काँग्रेस १ जागेवर समाधान मानावे लागले.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेऊन विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांचे नियोजन केले होते. मात्र या निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला असून, हे त्यांचे सलग तिसरे अपयश मानले जात आहे.

निवडणूक प्रचारात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रचार केला. तरीही पक्षाचे बहुतांश उमेदवार पराभूत झाले. विशेष म्हणजे प्रणिती शिंदे यांचे जुने घर असलेल्या विजयपूर महामार्गावरील प्रभाग क्रमांक २३ मध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याने, त्यांच्या प्रभागातील मतदारांनीच उमेदवारांना नाकारल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Praniti Shinde Writes to Party Workers After Crushing Solapur Civic Poll Loss

महत्वाच्या बातम्या