“अपार”आयडी काढला का?३१ जानेवारी अंतिम मुदत…

विशेष प्रतिनिधी

पुणे: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ‘अपार’ अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन आयडी काढण्यासाठी केंद्र सरकारने ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांचा ‘अपार’ आयडी अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवण्यासाठी ‘अपार’ आयडी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या आयडीद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश, गुणपत्रके, प्रमाणपत्रे, परीक्षा नोंदी आणि शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. मात्र आधारकार्ड आणि शालेय नोंदीतील नावातील तफावत, आधार अपडेट न झाल्याची अडचण, इंटरनेट कनेक्टिव्हिटी समस्या आणि तांत्रिक त्रुटी यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा ‘अपार’ आयडी तयार होऊ शकलेला नाही.



अपार आयडी म्हणजे काय?

‘अपार’ आयडी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा आजीवन शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. हा आयडी तयार झाल्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण शैक्षणिक वाटचाल डिजिटल स्वरूपात नोंदवली जाणार आहे. भविष्यातील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा तसेच सीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी हा आयडी अनिवार्य करण्यात येणार आहे.

अपार नसल्यास काय अडचणी?

जर विद्यार्थ्याचा ‘अपार’ आयडी तयार झाला नाही, तर शैक्षणिक नोंदी डिजिटल प्रणालीत अपलोड होणार नाहीत. परिणामी महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती मिळवणे, स्पर्धा परीक्षा नोंदणी आणि इतर शैक्षणिक सेवांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये सीईटी आणि इतर प्रवेश परीक्षांपासून विद्यार्थी वंचित राहण्याचीही शक्यता आहे.

अपार आयडी कसा काढायचा?

शाळामार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून ‘अपार’ आयडी काढता येतो. यासाठी आधारकार्डवरील नाव आणि शालेय नोंदीतील नाव एकसमान असणे आवश्यक आहे. शाळेकडून आवश्यक माहिती दिल्यानंतर केल्यानंतर विद्यार्थ्याचा ‘अपार’ आयडी तयार केला जातो.

सीईटीसाठी अपार आयडी अनिवार्य

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीईटी आणि इतर प्रवेश प्रक्रियांसाठी ‘अपार’ आयडी अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी तातडीने आपला आयडी तयार करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एकूणच ‘अपार’ आयडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी महत्त्वाचा डिजिटल आधार ठरणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Have you obtained your ‘APAR’ ID? January 31st is the deadline…

महत्वाच्या बातम्या