विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये १० सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. या करारांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी विक्रमी ९६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या (८,७३,६०० कोटी) गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे सुमारे ९.६ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.
गेल्या वर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये ४० अब्ज अमेरिकन डॉलरची (३,६०,००० कोटी रुपये) गुंतवणूक झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर यंदा पहिल्याच दिवशी ९६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीचे करार झाले.
या गुंतवणुकीमुळे सुमारे ९.६ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून शाश्वत पायाभूत सुविधा आणि उच्च-तंत्रज्ञानाधारित परिसंस्थांचे केंद्र म्हणून मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) नव्याने ओळख निर्माण होणार आहे.
‘एसबीजी ग्रुप’सोबत ४५ अब्ज डॉलर्सचा (४,०९,५०० कोटी) करार करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशाला लॉजिस्टिक्स, औद्योगिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
एमएमआरडीए आणि ‘एसबीजी ग्रुप’ यांच्या संयुक्त भागीदारीने एमएमआरमधील मोक्याच्या ठिकाणी एकात्मिक लॉजिस्टिक्स, औद्योगिक आणि हायपरस्केल डेटा पार्क्सचे नियोजन, विकास आणि संचालन करण्यात येणार आहे. या भागीदारीत मल्टिमोडल लॉजिस्टिक्स सुविधा, वेअरहाऊसिंग आणि वितरण केंद्रे, ई-कॉमर्स फुलफिलमेंट हब्स, कोल्ड-चेन आणि कृषी-लॉजिस्टिक्स सुविधा, ट्रक टर्मिनल्स, मूल्यवर्धित लॉजिस्टिक्स सेवा, उत्पादन व असेंब्ली सुविधा, हायपरस्केल आणि एज डेटा पार्क्स, डिजिटल पायाभूत सुविधा हब्स तसेच त्यास पूरक स्मार्ट सिस्टीम्स आणि युटिलिटीज यांचा समावेश असेल. या सहयोगाच्या माध्यमातून येत्या १० वर्षांत अंदाजे ४५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून, त्यातून मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सुमारे ४.५ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.
एमएमआरडीए भूखंड निश्चिती, आवश्यक वैधानिक मंजुरी तसेच ट्रंक (संपूर्ण प्रकल्पाला आधार देणाऱ्या मुख्य पायाभूत सुविधा) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडेल. तर ‘एसबीजी ग्रुप’ गुंतवणूक उभारणीचे नेतृत्व, प्रकल्पांचा विकास आणि दीर्घकालीन व्यवस्थापन करेल. तसेच जागतिक मानकांशी सुसंगतता आणि शाश्वततेच्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन सुनिश्चित करण्यात येईल.
‘पंचशील रियल्टी’ २५ अब्ज डॉलर्सची (₹२,२७,५०० कोटी) गुंतवणूक करणार आहे. या दहा वर्षांच्या कराराअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विकासाच्या रचनेचे रूपांतर व बहुविभागीय विकास धोरण राबवण्यासाठी एमएमआरडीए आणि ‘पंचशील रियल्टी’ सहयोग करणार आहेत.
Investment of Rs 8 lakh 73 thousand 600 crore in MMRDA
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला