आम्ही त्याग केलाय, कोल्हापूर महापालिकेत महापौर शिवसेनेचाच , राजेश क्षीरसागर यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: निवडणुकीत आम्ही मोठा त्याग केलाय. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच निवडणुका व्हाव्यात, हा त्यांचा सुरुवातीपासून प्रामाणिक हेतू होता. युतीत कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग केला असून, विधानसभेत जशी कोल्हापूर उत्तरमधील प्रत्येक पेठ शिवसेनेसोबत होती, तशीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही झाल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणूक निकालांचा उल्लेख करताना क्षीरसागर म्हणाले की, भाजपला 26, शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 4 आणि जनसुराज्यला 1 अशा एकूण 46 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



शिवसेना–कॉंग्रेस युतीचा ‘निगेटिव्ह नरेटीव्ह’ फेटाळला

काही घटकांकडून शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येणार असल्याचा निगेटिव्ह नरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप करत क्षीरसागर म्हणाले की, या बाबत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती असून, त्यांची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची इच्छा आता पूर्ण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे सांगत क्षीरसागर म्हणाले की, जागावाटपात शिवसेनेने मोठा त्याग केला. विधानसभेत ‘उत्तर’च्या सर्व पेठा शिवसेनेसोबत थेट होत्या आणि हेच चित्र महापालिका निवडणुकीतही दिसून आले. 20 पैकी 16 प्रभागांत महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले.

कसबा बावड्यात बोगस मतदानाचे आरोप

कसबा बावड्यात पराभूत झालेल्या उमेदवारांनी भेट घेऊन बोगस मतदान आणि दादागिरीबाबत माहिती दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले असले, तरी नैतिक विजय आमचाच असल्याचा दावा त्यांनी केला. बोगसगिरीच्या जोरावर स्वतःला मोठा शहाणा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना जनतेने योग्य उत्तर दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

We Made Sacrifices, Shiv Sena Will Get Kolhapur Mayor,’ Claims Rajesh Kshirsagar

महत्वाच्या बातम्या