विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आले आहे. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ४४ मतांची गरज असून, भाजपला अद्याप बहुमतासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. Amravati Municipal Corporation
१५ नगरसेवक असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपला पाठिंबा जाहीर केला असला, तरीही सत्तास्थापनेसाठी इतर घटक पक्षांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ११ आणि शिवसेना (शिंदे गट)चे ३ सदस्य मिळाल्यास सत्ता स्थापन करणे शक्य आहे. मात्र, स्थानिक नेतृत्वातील अंतर्गत संघर्षामुळे या प्रक्रियेला अडथळे येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या भाजपने ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने अमरावती महापालिकेतही भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा आशावाद भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, सत्तास्थापनेच्या हालचाली मंदावल्या असून, भाजपकडून अद्याप गटनेत्याची निवड न झाल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, गटनेत्याच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपसमोरील अडचणी लक्षात घेता काँग्रेसनेही महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले असून, सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट), एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), बसप आणि वंचित बहुजन आघाडी यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, इतक्या पक्षांना एकत्र आणणे हे काँग्रेसपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.
युवा स्वाभिमानच्या पाठिंब्याने भाजपचाच महापौर होईल, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार संजय खोडके आणि रवी राणा यांच्यातील राजकीय वाद संपणार का, तसेच शिवसेना (शिंदे गट)चे माजी आमदार अभिजीत अडसूळ आणि राणा यांच्यातील संघर्ष थांबणार का, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
‘वेट अँड वॉच’ची भूमिका – डॉ. नितीन धांडे
महापौरपदाच्या निवडणुकीला अद्याप वेळ असल्याने भाजपची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ अशी असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी सांगितले. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने अमरावतीतही भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सहज सत्ता स्थापन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या गटनेत्याची निवड लवकरच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
BJP Awaits Support of Other Parties to Form Power in Amravati Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला