विशेष प्रतिनिधी
जळगाव : आपल्या तरुणांकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. पण आपण बिहारींवर टीका करतो. कशाला टीका करता? आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे. तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला. आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा पाहू, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, आपण नुसत्या गप्पा मारतो की, अंबानी शून्यातून कसे मोठे झाले. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हीही प्रयत्न करून पाहा. मी काय राजकारणी होतो का? पण आता आमच्या धंद्यात आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टीत नैपुण्य दाखवण्याची गरज आहे. जळगावच्या एमआयडीसीला डी प्लसचा दर्जा देण्यासाठी मी 7 वर्षे लढा दिला. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी सुभाष देसाई हे आमचे उद्योगमंत्री होते. ते लक्ष देत नव्हते. ते माझ्याकडे पाहायचेही नाही. एकेदिवशी पक्षाच्या बैठकीत मी त्यांना थेट बोललो की, आमच्याकडेही पाहत चला.
मी काही तुमच्याकडे उधारी मागायला आलो नाही. स्पष्टपणे बोललो. पण त्यानंतरही त्यांनी आमचे काम केले नाही. अखेर हा विषय मंत्रिमंडळात मंजूर झाला. या मुद्यावरून बैठकीत अनेकदा वाद झाला. छोटे-छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील. आपल्याला आपल्या जिल्ह्यातील केळीवर आधारित उद्योगांचीही मोठी गरज आहे. राज्यातील अंगणवाड्यांतील पोषण आहारात केळीचा समावेश करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबरावांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. जळगावात येणारी कोको कोला कंपनी जामनेरला गेली. जामनेर चाळीसगावात गेले. आपण आमदार आहेत की नाही हे एकदा बघावे लागेल. विशेषः पुढच्यावेळी मला कोट घालून दावोसच्या दौऱ्यावरही जावे लागेल, असे ते म्हणाले.
आता दोन्ही भाऊ (राज व उद्धव ठाकरे) एकत्र आलेत. प्रत्येकाचा एक विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. कोण कधी कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही. आता आपण एमआयएमची कुणासोबत युती आहे हे पाहत आहोत. त्यामुळे कुणी कुणासोबतही जाऊ शकते. या प्रकरणी कुणीही काहीही कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र येतील का? तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे पाटील म्हणाले होते.