ग्रामपंचायतींच्या निवडणुका सहा महिन्यांनी पुढे जाणार, प्रशासकांची नियुक्ती होणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिन्यांनी पुढे ढकलल्या जाणार असून, त्या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. Gram Panchayat Elections

राज्यातील एकूण 14,237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत संपणार आहे. मात्र, या ग्रामपंचायतींवर तात्काळ निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत. हे आदेश 14 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे देण्यात आले असून, ग्रामविकास विभागाचे अपर सचिव यांनी यासंदर्भातील स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहेत.

या निर्णयानुसार, ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपेल, त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबवण्याऐवजी प्रशासकीय व्यवस्थेअंतर्गत कारभार चालवण्यात येणार आहे. त्यामुळे किमान सहा महिन्यांपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नसणार असून, प्रशासकांकडूनच सर्व निर्णय घेतले जातील.



विभागनिहाय ग्रामपंचायतींची संख्या

राज्यातील विविध विभागांमध्ये कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

नागपूर विभाग: 1,508 ग्रामपंचायती
कोकण विभाग: 798 ग्रामपंचायती
नाशिक विभाग: 2,476 ग्रामपंचायती
पुणे विभाग: 2,870 ग्रामपंचायती
छत्रपती संभाजीनगर विभाग: 4,134 ग्रामपंचायती

या निर्णयामुळे राज्यभरातील ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त केली जात असून, लोकशाही प्रक्रियेला विलंब लावला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे, प्रशासकीय कारणे, निवडणूक व्यवस्थापन आणि कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.
आगामी काळात राज्य निवडणूक आयोग या विषयावर नेमकी काय भूमिका घेतो, तसेच निवडणुकांचे सुधारित वेळापत्रक कधी जाहीर होते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Gram Panchayat Elections Deferred by Six Months, Administrators to Be Appointed

महत्वाच्या बातम्या