डीपीआरशिवाय २५ हजार कोटींची कुंभमेळा कामे? नाशिकमध्ये अनागोंदीचा विजय कुंभार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची कामे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) शिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यासाठी कोणताही एकात्मिक ‘कुंभमेळा’ अथवा डीपीआर तयारच करण्यात आलेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

विजय कुंभार यांनी कुंभमेळ्यासंदर्भात नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाकडे माहिती अधिकारात (RTI)अर्ज करून डीपीआरची माहिती मागितली होती. मात्र वेळेत उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतर समाजमाध्यमांवर मुद्दा मांडल्यानंतर जे उत्तर देण्यात आले, ते डीपीआर नसून केवळ वेगवेगळ्या विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची तुकड्या-तुकड्यांची माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ असा की कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र, अधिकृत आणि एकात्मिक डीपीआर अस्तित्वातच नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे.



२०२५ मध्ये अस्तित्वात आलेल्या नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियमानुसार कुंभमेळ्यासाठी एकात्मिक आराखडा (Kumbh Mela Plan) तयार करणे बंधनकारक आहे. या कायद्यात स्पष्ट तरतुदी असूनही त्यांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कायद्यानुसार सर्व नियोजन, मंजुरी, खर्च आणि अंमलबजावणी ही कुंभमेळा प्राधिकरणामार्फत आणि DPRच्या आधारेच होणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात विभागनिहाय स्वतंत्र कामे, विखुरलेला खर्च आणि कोणताही केंद्रीकृत आराखडा नसल्याचे समोर आले आहे.

कुंभार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, DPR शिवाय प्रकल्प म्हणजे नियोजनशून्य प्रशासन, आणि DPR शिवाय होणारा खर्च म्हणजे अंदाजपंचे खर्च, अपव्यय, भ्रष्टाचार आणि निधीचा गैरवापर होण्याचा धोका. कुंभमेळ्यासाठी विशेष कायदा, मंत्रिमंडळ समिती आणि वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करूनही जर कायद्याचे पालनच केले जात नसेल, तर असा कायदा करण्याचा उपयोग काय, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

या आरोपांमुळे नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीबाबत मोठा वाद निर्माण झाला असून, श्रद्धेच्या महापर्वामागे प्रशासनिक अनागोंदी आणि नियोजनाचा अभाव दडलेला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

25,000 Crore Kumbh Mela Works Without DPR? Chaos Alleged in Nashik Planning

महत्वाच्या बातम्या