Mumbai Mayo RituTawde: मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने भाजपच्या रितू तावडे मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असलेली मुंबई महापालिकेवर भाजपच्या रितू तावडे या महापौर म्हणून विराजमान झालेल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. आज बुधवारी रितू तावडे यांनी महापौर पदाचा आणि शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.



सभागृहात पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह दणाणून सोडले. तर, त्यांच्या या घोषणेपाठोपाठ चोर है.. चोर है… म्हणत ठाकरेंच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा महापौर – उपमहापौर विराजमान होण्याआधी महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेत येताच भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात आले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांनी सुद्धा घोषणाबाजी सुरू केली.
महापालिकेच्या सभागृहात एकीकडे भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी.. मोदी.. च्या घोषणा सुरू असतानाच त्याचवेळी दुसरीकडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी चोर है.. चोर है.. च्या घोषणा दिल्या. ज्यानंतर या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांकडून मोठा गोंधळ घातला गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी देवाभाऊ म्हणून घोषणा सुरू केल्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ठाकरेच्या घोषणा दिल्या. त्यामुळे महापालिकेच्या पहिल्याच दिवशी घोषणांमुळे पालिकेच्या सभागृहात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम सभागृहाच्या गॅलरीत बसून हा प्रकार शांतपणे पाहत होते.

Ritu Tawde Sworn In as Mumbai Mayor in Presence of Chief Minister

महत्वाच्या बातम्या