वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या गदेचे पूजा

विशेष प्रतिनिधी

पुणे: महाराष्ट्राच्या पारंपरिक क्रीडापरंपरेतील मानाची स्पर्धा असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण तसेच विजेत्याला दिल्या जाणाऱ्या मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे आयोजित कार्यक्रमात हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने या वर्षीची ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील Wagholi येथे आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत आपली ताकद आजमावणार आहेत. पारंपरिक मातीच्या कुस्तीची समृद्ध परंपरा जपत ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्याची तयारी आयोजकांकडून करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे आयोजन रामकृष्ण सातव पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात येत आहे. कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. राज्यातील कुस्ती या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व मोठे असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा समारोप सोहळा विशेष आकर्षण ठरणार असून विजेत्या मल्लाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि Toyota Fortuner गाडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील कुस्तीप्रेमी आणि मल्लांमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Maharashtra Kesari 2025-26′ to be staged in Wagholi

महत्वाच्या बातम्या