गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतीकाम करताना होणाऱ्या अपघातांमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात असून या योजनेमुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळत असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.

यावेळी बोलताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, शेती हा केवळ शेतकऱ्यांचा नाही तर शेतमजुरांचाही जीवनाशी निगडित व्यवसाय आहे. शेतामध्ये काम करताना अनेक वेळा अपघात घडतात आणि त्याचा मोठा फटका शेतकरी तसेच शेतमजूर कुटुंबांना बसतो. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिक व्यापक व्हावा या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.



या निर्णयामागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच कृषी व संबंधित विभागातील नेतृत्वाचा दूरदृष्टीपूर्ण विचार असून, विशेषतः राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या योजनेच्या विस्तारासाठी सातत्याने पुढाकार घेतला, असे सांगत भरणे यांनी विधानसभेत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

ते म्हणाले की, शेतकरी आणि शेतमजूर या दोन्ही घटकांना सुरक्षिततेची हमी देणे ही राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या दृष्टीने सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, अपघातग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक आधार मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शेतीशी निगडित प्रत्येक घटक सुरक्षित राहावा, तसेच अपघातामुळे उद्भवणाऱ्या संकटात शासन ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहावे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश असून, राज्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“शेतीचा कणा असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

Farm Labourers Included in Gopinath Munde Farmers Accident Security Scheme: Minister Dattatray Bharne

महत्वाच्या बातम्या