विशेष प्रतिनिधी
मुंबई : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या, असा आदेश अन्नपुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. गॅस वितरकांवर काही ठिकाणी हल्ले होत असल्याने त्यांच्यासह वितरण कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनासह गॅस एजन्सीलादेखील संरक्षण देण्याचा आदेश देण्यात आला आहे. अन्न व पुरवठा विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक काढले असून गॅस स्थिती पूर्वस्थितीवर येत नाही तोपर्यंत हे धोरण लागू असेल, असे स्पष्ट केले आहे. पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून त्यात पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत.
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे सध्या जगभरात इंधन टंचाईचे संकट उभे राहिले आहे. भारतात विशेषत: गॅसचा तुटवडाजाणवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून एरवी सहजपणे मिळणारा एलपीजी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी जास्त वाट पाहावी लागत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून हे नागरिक गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना दिसत आहेत.
अनेक ठिकाणी गॅस वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे हाणामारीचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे गॅस वितरकांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, राज्यात कोठेही गॅसची टंचाई नाही. त्यामुळे ग्राहकांनी रांगा लावू नयेत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Food Supply Department Orders District Administration to Provide Police Protection to Gas Distributors
महत्वाच्या बातम्या