मनसेत मराठी चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गजांची एन्ट्री; भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदे यांनी राज ठाकरेंची घेतली भेट

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला आहे. तिघांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेत पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. MNS

मनसेत प्रवेशाच्या वेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेत्या शालिनी ठाकरे तसेच प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ आणि नाट्यकर्मी भरत दाभोळकर उपस्थित होते. राज ठाकरे यांनी कलाकारांशी मनमोकळा संवाद साधत मराठी संस्कृती, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.



गेल्या आठवड्यात रायगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सदस्य नोंदणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राज्यभरातून विविध क्षेत्रातील व्यक्ती मनसेत प्रवेश करत असल्याचे दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार मनसेत दाखल झाल्याने पक्षाला सांस्कृतिक आणि जनसंपर्काच्या पातळीवर नवी ऊर्जा मिळू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील तरुणांमध्ये या कलाकारांची मोठी लोकप्रियता असल्याने मनसेला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो.

यावेळी बोलताना भरत दाभोळकर यांनी सांगितले की, “राज ठाकरे अनेक वर्षांपासून मुंबई आणि मराठी माणसासाठी काम करत आहेत. त्यांच्या विविध अभियानांमध्ये सहभागी होण्याची आमची नेहमीच तयारी असते. एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. कधी कधी पक्षात प्रवेश करण्यापेक्षा बाहेरूनही मार्गदर्शन करता येते. एखादी व्यक्ती पक्षात नसली तरीही ती योग्य दिशा देऊ शकते.”

Three Prominent Marathi Film Personalities Join MNS; Bharat Jadhav, Pushkar Shrotri and Kedar Shinde Meet Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या