पेट्रोल-डिझेलवर एक्साईज ड्युटी कपात; दरवाढीच्या अफवांनंतर सरकारचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई: देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या अफवांमुळे पंपांवर नागरिकांची गर्दी वाढत असताना केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेत अबकारी करात (एक्साईज ड्युटी) मोठी कपात केली आहे. या निर्णयामुळे सध्या तरी इंधन दर वाढण्याची शक्यता कमी झाली असून बाजारात स्थिरता राखण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. Petrol and Diesel

केंद्र सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 13 रुपयांवरून थेट 10 रुपयांनी कमी करून 3 रुपये प्रति लिटर केली आहे. तर डिझेलवरील 10 रुपयांची एक्साईज ड्युटी पूर्णपणे रद्द करण्यात आली असून ती शून्यावर आणण्यात आली आहे. या निर्णयामुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होणार असून ग्राहकांनाही अप्रत्यक्ष दिलासा मिळणार आहे.



एक्साईज ड्युटी हा एक अप्रत्यक्ष कर असून तो वस्तूंच्या उत्पादनावर किंवा निर्मितीवर केंद्र सरकारकडून आकारला जातो. पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत केंद्र सरकार एक्साईज ड्युटी आकारते, तर राज्य सरकारे त्यावर व्हॅट (VAT) लावतात. त्यामुळे इंधनाच्या अंतिम किमतीवर या दोन्ही करांचा प्रभाव पडतो. एक्साईज ड्युटी कमी केल्याने इंधन दर वाढण्याचा दबाव काही प्रमाणात कमी होतो.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर तणाव निर्माण झाल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. विशेषतः मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि ईरानशी संबंधित तणावामुळे भविष्यात इंधन दर वाढू शकतात, अशा चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यास सुरुवात केली होती. काही ठिकाणी पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, केंद्र सरकारने या सर्व अफवा फेटाळून लावत देशात कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, भारताकडे सुमारे 60 दिवसांचा इंधन साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी नायरा एनर्जीने पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने महाग केले होते. त्यामुळे काही शहरांमध्ये दर वाढलेले दिसून आले. उदाहरणार्थ, भोपालमध्ये पेट्रोलचा दर 111.72 रुपये, तर डिझेल 94.88 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक कर आणि व्हॅटनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे दर बदलू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत आंतरराष्ट्रीय परिस्थिती, विशेषतः इराणशी संबंधित तणाव आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 24 मार्च रोजी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी इशारा दिला होता की, जागतिक तणाव कायम राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि देशाला पुन्हा एकदा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

सरकारने एक्साईज ड्युटी कपात करून इंधन दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Excise Duty Cut on Petrol and Diesel; Government’s Big Move After Price Hike Rumours

महत्वाच्या बातम्या