विशेष प्रतिनिधी
पुणे: जिल्ह्यातल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवल्याने आता ही लढत अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेस महाराष्ट्रने जशास तसे उत्तर दिले असून, अत्यंत गंभीर आरोप करत पार्थ पवारांना सुनावले आहे.
पार्थ पवारांची टीका आणि ‘डाऊनफॉल’चे विधान
निवडणूक बिनविरोध न झाल्याबद्दल भाष्य करताना पार्थ पवार म्हणाले होते की, “काँग्रेसने देखील या विषयावर गांभीर्याने विचार करायला हवा होता. मात्र, आता निवडणूक होत असेल तर आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत. बारामती आणि महाराष्ट्रातील जनता अजितदादांसोबत आहे. मुळात काँग्रेसचा सध्या ‘डाऊनफॉल’ सुरू आहे.” पार्थ यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी पडली.
काँग्रेसचा जळजळीत पलटवार
“धड भाषणही येत नाही…”
पार्थ पवारांच्या टीकेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “धड भाषणही देता न येणाऱ्या आणि केवळ कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलणे म्हणजे अतिशयोक्ती आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांचा समाचार घेतला.
वडिलांच्या अपघाती मृत्यूचा उल्लेख आणि गंभीर आरोप
काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये केवळ राजकीय टीका न करता अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील मुद्द्याला हात घातला आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की..
“स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर जमीन घोटाळ्याच्या चौकशीतून वाचण्यासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या आणि महाशक्तीसमोर शरण आलेल्या या मुलाने काँग्रेसबद्दल न बोललेलेच बरे. यावेळी कर्नाटक सरकारचा संदर्भ देखील देत, या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंदवला आहे, जिथे काँग्रेसचे सरकार आहे.
बारामतीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी एक मोठे आव्हान दिले आहे. “महाराष्ट्रात त्या संशयास्पद अपघाताचा गुन्हा नोंद करा, मी निवडणुकीतून माघार घेईन,” अशी मागणी मोरे यांनी केली आहे. यावर पार्थ पवारांनी बोलावे, असेही काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
बारामतीची लढाई आता प्रतिष्ठेची
सुरुवातीला शांत वाटणारी ही पोटनिवडणूक आता आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजणार असल्याचे चित्र आहे. एका बाजूला महायुतीची ताकद आणि सुनेत्रा पवार यांची उमेदवारी आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ही लढाई थेट वैयक्तिक अस्मितेवर आणि जुन्या प्रकरणांवर आणून ठेवली आहे. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Congress Hits Back at Parth Pawar; Baramati By-election Sparks Intense Political Row
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर