अमेरिका – इराण युद्ध थांबले, दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. US–Iran Ceasefire

गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजेपर्यंत इराणला कडक इशारा दिला होता. इराणने सैन्य माघारी न घेतल्यास त्यांच्या वीज प्रकल्पांवर भीषण हल्ले करून देश उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, हा दिलेला ‘अल्टिमेटम’ संपण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या मुत्सद्यांमध्ये यशस्वी चर्चा झाली आणि सशर्त शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे जागतिक बाजारातील तेलाचे संकट आणि महायुद्धाची भीती काही काळासाठी कमी झाली असून, आता सर्व लक्ष पुढील दोन आठवड्यांत होणाऱ्या राजनैतिक हालचालींकडे लागले आहे.



अमेरिका आणि इराणमधील विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी आशियाई सत्तांनी घेतलेला पुढाकार यशस्वी ठरताना दिसत आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष तूर्त शांत करण्यामागे चीन आणि पाकिस्तानची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेकडे एक सविस्तर ‘शांती प्रस्ताव’ पाठवला असून, अमेरिकन प्रशासनाने हा मसुदा वाटाघाटीसाठी सकारात्मक आधार म्हणून स्वीकारला आहे.

सध्या दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी लागू झाली असून, प्रत्यक्ष चर्चेची फेरी १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पार पडणार आहे. या बैठकीत इराण आणि अमेरिकेचे उच्चपदस्थ प्रतिनिधी आमनेसामने बसून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जगावर ओढवलेले युद्धाचे सावट आता काहीसे दूर झाले आहे.

इराणने दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत म्हणाले की, अत्यंत विनम्रतेने, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ आणि ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असं शाहबाज शरीफ पोस्ट करत म्हणाले.

US–Iran Ceasefire Announced, Two-Week Truce Declared

महत्वाच्या बातम्या