विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2026 च्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होताच देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये राजकीय चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे सुरू असलेल्या मतमोजणीच्या प्रारंभिक कलांमध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी समोर येत आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजपने बंगाल आणि आसाममध्ये जोरदार आघाडी घेतली आहे, तर तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या पक्षाने पारंपरिक राजकारणाला मोठा धक्का दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप 190 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यात सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे.
भवानीपूर या ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात चुरशीची लढत सुरू आहे. येथे भाजपचे सुवेंदू अधिकारी वेळोवेळी आघाडी घेताना दिसत आहेत. नंदीग्राममध्येही त्यांची आघाडी कायम आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाच्या नेत्या सागरिका घोष यांनी 293 पैकी 70 हून अधिक जागांचे कल जाहीर करण्यात आले नसल्याचा आरोप करत सर्व आकडे तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रचंड आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप बहुमताच्या पुढे जात असल्याचे दिसत आहे.काँग्रेसला येथे मोठा फटका बसताना दिसत असून पक्षाला 30 जागांपर्यंत पोहोचणेही कठीण होत आहे. त्यामुळे आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात यावेळी सर्वात मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळत आहे. अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (TVK) पक्षाने 110 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून पारंपरिक डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांना मोठा धक्का दिला आहे.
मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके अपेक्षेपेक्षा मागे पडताना दिसत आहे, तर एआयएडीएमकेही स्पर्धेत मागे आहे. त्यामुळे राज्यात आता तिरंगी लढत रंगली असून विजय यांच्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत दमदार उपस्थिती दाखवली आहे. सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. एआयएडीएमके दुसऱ्या स्थानावर आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कोलाथूरमधील आपली जागा गमावली आहे. केरळमध्ये काँग्रेस पक्षासाठी तुलनेने सकारात्मक चित्र दिसत आहे. येथे पक्ष स्पर्धेत टिकून असून काही जागांवर आघाडी घेत आहे. त्यामुळे दक्षिण भारतात काँग्रेससाठी केरळ हा एकमेव दिलासा देणारा राज्य ठरत आहे.
पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा सत्तेत येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सुरुवातीचे कल दर्शवतात. येथे सत्ताधारी आघाडीला मतदारांनी पुन्हा संधी दिल्याचे चित्र आहे.
सध्या मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल येणे बाकी आहे. मात्र, सुरुवातीच्या कलांनीच देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोणत्या राज्यात कोण सत्तेत येणार, कोणते विक्रम मोडले जाणार आणि कोणते नवे राजकीय समीकरण तयार होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
BJP surges in Bengal and Assam, Thalapathy Vijay’s party makes blockbuster entry in Tamil Nadu, Congress finds solace in Kerala
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार