CBI busts : आंतरराष्ट्रीय सायबर गुलामी टोळीचा सीबीआयकडून पर्दाफाश, मुंबईसह देशात नऊ ठिकाणी छापेमारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CBI busts भारतीय तरुणांना परदेशात भरघोस पगार आणि आलिशान जीवनाचे आमिष दाखवून सायबर गुलामगिरीत ओढणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. सीबीआयने मुंबईसह अनेक शहरांमधील नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून या संघटित नेटवर्कवर मोठी कारवाई केली असून या प्रकरणात लखनऊमध्ये एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी केलेल्या तपासात असे उघड झाले आहे की, ही टोळी तरुणांना नोकरीच्या खोट्या संधी देऊन म्यानमार आणि कंबोडियासारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये पाठवत होती. तिथे पोहोचल्यावर त्यांना सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांकडे पाठवले जात असे. ही ठिकाणे सायबर गुलामगिरी केंद्रे म्हणून ओळखली जातात, जिथे पीडितांना कैदेत ठेवले जाते आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध गुन्हे करण्यास भाग पाडले जात होते.CBI busts



सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तरुणांना सुरुवातीला भरघोस पगार आणि आलिशान जीवनाचे आमिष दाखवून आकर्षित केले जात होते. परंतु परदेशात पोहोचल्यावर त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेतले जात आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवली जात होती. मात्र, कोणी या गोष्टीचा विरोध केल्यास त्यांना मारहाण करण्यात येत असे आणि त्यांचा मानसिक छळ केला जात होता. पीडितांना अंधाऱ्या खोल्यांमध्ये नजरकैदेत ठेवल्याची आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबीयांकडून खंडणी मागितल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. हे नेटवर्क मुंबईव्यतिरिक्त दिल्ली, लखनऊ, काशीपूर आणि उत्तर प्रदेशातील गोंडा व सहारनपूरपर्यंत पसरलेले आहे. मुंबईतील छाप्यांदरम्यान, स्थानिक एजंट तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरत असलेल्या डिजिटल पुराव्यांचा तपास एजन्सीने केला. या प्रकरणी मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून, त्यांच्या तपासातून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

टोळीतील सदस्यांना मानवी तस्करीसाठी मोठी रक्कम कमिशन म्हणून मिळत होती आणि पकडले जाऊ नये म्हणून हे पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे दिले जात होते. प्राथमिक तपासानुसार, या नेटवर्कचे संबंध इतर अनेक देशांशी असू शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, सोशल मीडिया, ऑनलाइन जाहिराती किंवा संशयास्पद एजंट्सकडून मिळणाऱ्या परदेशी नोकरीच्या संधींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा इशारा सीबीआयने लोकांना दिला आहे. अशा संधींमुळे केवळ शोषण आणि गुलामगिरीच होत नाही, तर व्यक्ती आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांमध्येही अडकू शकते, ज्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, असेही सीबीआयने सांगितले आहे.

CBI busts international cyber slavery racket; raids at nine locations including

महत्वाच्या बातम्या