पुणे महापालिकेत आता आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेईकल डे’; महापौरांचा पुढाकार!

विशेष प्रतिनिधी

पुणे: महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी वर्गाने आठवड्यातून किमान एक दिवस खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापौर मंजुषा नागपुरे यांनी मांडला आहे. यासंदर्भात त्यांनी मा. आयुक्त यांना अधिकृत पत्र पाठविले आहे.

जागतिक पातळीवर इंधनाशी संबंधित निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबविण्याची गरज महापौरांनी व्यक्त केली आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहरांमधील वाहतूक सुलभतेसाठी मेट्रोसारख्या सार्वजनिक प्रकल्पांच्या वापरावर दिलेल्या भराचा उल्लेख यावेळी करण्यात आला आहे.



महापौरांनी आपल्या पत्रात पुढील सूचना मांडल्या आहेत

महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी आठवड्यातून एक दिवस ‘पीएमपीएमएल’ बस किंवा ‘पुणे मेट्रो’चा वापर करावा.

शक्य असल्यास सायकलचा वापर करून पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन द्यावे.तसेच अपरिहार्य परिस्थितीत ‘कारपूलिंग’चा अवलंब करावा.

महापौरांनी नमूद केले की, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्यास सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. तसेच, प्रत्यक्ष प्रवास करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल.

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी तसेच इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती महापौरांनी केली आहे.

Pune Municipal Corporation to Observe ‘Public Transport Day’ Once a Week; Mayor’s Initiative

 

महत्वाच्या बातम्या