खडकीत भर बाजारात ‘चांदणे टोळी’वरून थेट गोळीबार

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुण्यातील खडकी बाजार परिसरातील गजबजलेल्या राजीव गांधीनगर भागात पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून थेट गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. “सगळ्यांचा हिशेब चुकता करू,” अशी खुली धमकी देत आरोपींनी भररस्त्यात पिस्तूल उगारून दहशत माजवली. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना रात्री उशिरा अटक केली.

सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार) आणि त्याचा साथीदार चिन्मय (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या मुजोर आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. महादेववाडी, खडकी) याने खडकी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. यातून आकाशने पोलिसांत तक्रार दिली होती. हीच पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी अडसूळ आणि त्याचा साथीदार चिन्मय हे आकाशवर सतत दबाव आणून त्याला धमकावत होते.



शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आकाश वाघमारे आणि त्याचा मित्र दुचाकीवरून राजीव गांधीनगर परिसरात आले असता, आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठले. आरोपींनी आधी त्यांना बेदम शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या अडसूळने, “हे दोघे ‘चांदणे टोळी’तील आहेत, यांना गोळ्याच घाल,” असे ओरडून चिन्मयच्या कंबरेला खोचलेले पिस्तूल उपसले. आरोपीने थेट आकाश आणि त्याच्या मित्रावर पिस्तूल रोखून गोळी झाडली. नशिबाने गोळी हुकल्याने दोघेही या जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावले.

भरचौकात गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच खडकी बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण गायकवाड करत आहेत.

Open firing over ‘Chandane Gang’ rivalry in busy Khadki market

महत्वाच्या बातम्या