पुणे महापौर कार्यालय, नागपूर संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि सायबर विभाग तातडीने सतर्क झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही महत्त्वाची ठिकाणे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.
ई-मेलमध्ये आयईडी (IED) बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट तारखा आणि वेळांचाही संदर्भ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.



धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ई-मेल नेमका कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि धमकी कितपत गंभीर आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सायबर तज्ज्ञांकडून ई-मेलची तांत्रिक पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत आहे.

तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Bomb Threat Issued to Pune Mayor’s Office and RSS Headquarters in Nagpur

महत्वाच्या बातम्या