विशेष प्रतिनिधी
पुणे : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर झालेल्या आरोपांवर आता कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याचे स्पष्ट करत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा राहिलेल्या रूपाली चाकणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आहे. या विकृतीविरोधातील हा लढा असून तो मी निश्चितपणे लढणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी, जमिनीच्या भागीदारीशी किंवा इतर व्यवहारांशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. तसेच त्यांनी कधीही कोणत्याही महिलेला खरात यांच्याकडे नेले नाही किंवा त्यांच्याशी संबंधित कोणतेही आक्षेपार्ह फोटो अथवा व्हिडिओ अस्तित्वात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोणताही पुरावा नसताना माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह आरोप करण्यात आले. हे आरोप अत्यंत वेदनादायक होते. त्यामुळे आता ही लढाई कायद्याच्या चौकटीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्या म्हणाल्या.
चाकणकर यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच त्यांनीही अशोक खरात यांना आध्यात्मिक गुरु मानले होते. त्यामुळे समोर आलेला पाद्यपूजेचा व्हिडिओ हा जुना असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. “पहिल्या दिवसापासून जे सांगत आले तेच आजही सांगत आहे. सत्य सर्वांसमोर आहे,” असे त्या म्हणाल्या.
खरात प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा यासाठी आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता, असे सांगत त्यांनी त्यानंतर झालेल्या बदनामी मोहिमेवर नाराजी व्यक्त केली. “एआयचा वापर करून खोटे व्हिडिओ तयार करण्यात आले आणि सातत्याने बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आशा मिरगे यांनी एका चर्चासत्रात केलेल्या वक्तव्यांबाबत आपण ४ एप्रिल रोजी कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र ती नोटीस स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे अखेर माझगाव न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करावी लागल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. “त्या दिवशी मी स्वतःही न्यायालयात उपस्थित राहणार आहे. हा केवळ माझा वैयक्तिक लढा नसून स्त्रीच्या सन्मानाचा लढा आहे,” असे त्यांनी म्हटले.
याशिवाय, कोणताही पुरावा नसताना बदनामीकारक आरोप करणाऱ्या इतर काही महिलांनाही दिल्ली उच्च न्यायालयातून नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्या प्रकरणातही आपण न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई आणि भीमाई यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर पुराव्याशिवाय शिंतोडे उडवले जाऊ नयेत, यासाठी हा लढा आहे,” असे सांगत चाकणकर यांनी सत्य आपल्या बाजूने असल्याचा पुनरुच्चार केला.
“मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. कोणताही पुरावा माझ्याविरोधात नाही. त्यामुळे हा लढा मी पूर्ण ताकदीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून लढणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Rupali Chakankar Vows Legal Fight Against Defamation
महत्वाच्या बातम्या