विलिनीकरणाच्या बदल्यात शरद पवारांना हाेती काॅंग्रेस अध्यक्षपदाची ऑफर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने स्वतः शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या बदल्यात त्यांना थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफरही देण्यात आली होती, असा दावा समोर आला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे काॅंग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावानंतर पडद्यामागच्या अनेक घडामाेडी येऊ लागल्या लागल्या आहेत. त्यामध्येच हा दावाही समाेर आला आहे. गांधी परिवारातील एका वरिष्ठ नेत्याने शरद पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. देशातील सर्वाधिक अनुभवी राजकारण्यांपैकी एक असलेल्या पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते, असा विचार काँग्रेस नेतृत्वात होता. जर त्या वेळी हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता, तर आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या जागी शरद पवार असते.

शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. पक्षाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणे आणि प्रादेशिक राजकारणात स्वतंत्र भूमिका कायम ठेवणे हे त्यांचे धोरण राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आलेली अध्यक्षपदासारखी मोठी ऑफर असूनही पवारांनी ती नम्रपणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी महाविकास आघाडी मजबूत होती आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांना सकारात्मक वातावरण असल्याने स्वतंत्र पक्ष म्हणून लढणे फायदेशीर ठरेल, असा विचारही त्यामागे असल्याचे मानले जाते.

मात्र 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत पक्षाचा मोठा गट सोबत घेतला. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हाने निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले असले, तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला. पक्षाच्या अनेक नेत्यांचे पक्षांतर, आर्थिक आणि संघटनात्मक मर्यादा यामुळे पुढील राजकीय रणनीतीबाबत नव्याने विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून भाजपविरोधी लढाई मजबूत करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष काँग्रेससोबत येण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले होते. ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासह विविध प्रादेशिक पक्षांमध्ये देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत व्यापक एकजूट आवश्यक असल्याची भावना निर्माण झाल्याचे पटोले यांनी सांगितले होते.



दुसरीकडे, शरद पवार गटातील नेत्यांनी मात्र विलिनीकरणाच्या चर्चांपासून काहीसे अंतर ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अशा कोणत्याही प्रस्तावाची अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे विलिनीकरण नसले तरी भविष्यात अधिक मजबूत राजकीय आघाडीची शक्यता नाकारता येत नाही.

जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांचे विलिनीकरण झाले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. महाविकास आघाडीतील नेतृत्वाचे समीकरण बदलू शकते. काँग्रेसला महाराष्ट्रात संघटनात्मक बळ मिळू शकते. भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण होण्यास मदत होऊ शकते. तसचे 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती अधिक मजबूत होऊ शकते. यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघांतील जागावाटपाचे गणित बदलेल.

सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र काँग्रेसमध्ये विलिनीकरण, भाजपविरोधी व्यापक आघाडी आणि शरद पवार यांची पुढील राजकीय भूमिका यावर सुरू झालेल्या चर्चांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.

Was Sharad Pawar offered the Congress presidency in exchange for a merger?

महत्वाच्या बातम्या