नाईक – शिंदे वाद : नवी मुंबई मनपाच्या कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंचे नाव वगळले

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील विमानतळावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा नवी मुंबई मनपाच्या कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंचे नाव वगळले गेले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील विमानतळावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 6 जून रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही ते आता पुन्हा एकदा सोमवारी (15 जून) होणाऱ्या आरोग्य सुविधांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव वगळण्यात आला आहे.



या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती. ज्यामध्ये स्थानिक आमदार व वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव प्रमुख आणि प्रथम होते. त्याशिवाय, खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही नावे निमंत्रक व पाहुणे म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना या पत्रिकेतून पूर्णपणे डावलण्यात आले. ज्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी असा प्रकार होत असेल तर शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असा इशाराच म्हस्केंकडून देण्यात आला.

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार सुरू आहे तो अत्यंत चुकीचा आहे. ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. यापूर्वी जेव्हा शिवसेनेची युतीशिवाय एकहाती सत्ता होती, तेव्हाही आम्ही भाजपच्या नेत्यांचा योग्य तो सन्मान राखून पत्रिकेत त्यांची नावे टाकत आलो आहोत. मात्र, नवी मुंबईत जर वारंवार आमच्या नेत्याचा असा अवमान केला जात असेल, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. या अवमानाचे उत्तर ‘शिवसेना स्टाईल’ने दिले जाईल, असा इशारा दिला. तर याबाबत जेव्हा प्रसार माध्यमांनी गणेश नाईक यांना विचारले तेव्हा, हा माझा प्रश्न नाही, आयुक्तांना महापौरांना विचारा, असे म्हणत त्यांनी यावर स्पष्टपणे बोलणे टाळले.

Eknath Shinde’s Name Omitted from Navi Mumbai Civic Event Invite Amid Naik-Shinde Rift

महत्वाच्या बातम्या