दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा तुमची मुले मोठी करा ना… शर्मिला ठाकरे यांचा भाजपवर संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष फोडण्यात आला. दुसऱ्यांची पक्ष कशाला फोडता. तुम्ही तुमची मुले मोठी करा ना… दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , विश्व हिंदू परिषदेत चांगली मुले आहेत. त्यांनी फक्त दुसऱ्यांच्याच सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाजपला केला. Sharmila Thackeray

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “पेट्रोल १०० रूपयांच्या वरती गेले आहे. १२ वर्षांपूर्वी भाजप ज्या मुद्द्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होतीच; त्याबद्दल कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही. माझ्याकडे दादरचे एक ज्वेलर आले होते. ते बोलले, चिपी विमानतळ बंद झाले आहे. तुम्ही कोणीच यावर आवाज उठवत नाही.’ २०१२ पासून नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून किती विमानतळे सुरू झाले आणि किती बंद झाले? एक विमानतळ बांधायचे असेल तर साधारण ४० ते ५० हजार कोटी रूपये खर्च येतो.”



नवी मुंबईला विमानतळ झाले आहे. आता पुरंदरला विमानतळ करत आहेत. पुण्यात एक विमानतळ आहे. एवढी हवाई दळणवळण कुठे सुरू आहे? ४० ते ५० हजार कोटी खर्च करून विमानतळ बांधायचे, एक-दोन विमाने उतरवायची आणि बंद करून टाकायचे. ज्वेलर मला बोलला की, चिपी येथील विमानांना चांगला प्रतिसाद मिळतोय. तरीसुद्धा गोव्याला प्रतिसाद कमी मिळत असल्याने बंद करून टाकले. मग तुम्ही विमानतळे बांधताय कशाला?” असा सवाल शर्मिला ठाकरेंनी उपस्थित केला.

“पुरंदरचे शेतकरी विरोध करत आहेत. पुरंदरमध्ये शेती पिकत आहे, ती जमीन जबदरस्तीने विकत घेतली जात आहे. शेतकऱ्यांना ती जमीन द्यायची नाही. शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी हरित लवादाकडे अर्ज दाखल केला आहे. पण, सर्वोच्च न्यायालायपासून हरित लवादा सरकारच्याच हातात आहे. तुम्हाला कुठेही न्याय मिळत नाही. सरकार १०० ते २०० वर्षे जुनी झाडे तोडत आहे. झाड तोडीमुळे उन्हाळा वाढला आहे. पाऊस उशिरा पडणार आहे. जमिनीतील पाणी कमी झाले आहे,” असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“Raise Your Own Leaders Instead of Poaching Others’: Sharmila Thackeray Slams BJP”

महत्वाच्या बातम्या