टीईटी पेपरफुटीवरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून आज पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. या घोटाळ्याला महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. TET Paper Leak

“पेपर फुटले भिवंडीला, पैसे गेले मालेगावला”, “शिक्षकांचे नुकसान करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “टीईटी घोटाळ्याची चौकशी करा” अशा घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून गेला. राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.



विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात अपयश आल्याचा आरोप केला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून भरती प्रक्रिया निष्पक्ष करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सावकारी कर्ज आणि किडनी विक्री प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले.
रोशन कुळे प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या दिवाकर निकुरे याला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निकुरेने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत सुमारे १३० धनादेश दिले, मात्र ते सर्व धनादेश बाऊन्स झाले. एवढ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीनंतरही आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करत त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमक्या आणि अपशब्द वापरण्यात आल्याच्या प्रकरणावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाच सुरक्षित वातावरण मिळत नसेल, तर राज्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला.

पत्रकारांवरील कथित गैरवर्तनाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

Opposition Protests on Assembly Steps Over TET Paper Leak, Demands Education Minister’s Resignation

महत्वाच्या बातम्या