CM Devendra Fadnavis : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई: CM Devendra Fadnavis राज्यातील अनेक भागांसह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या काही भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील दोन दिवस अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.CM Devendra Fadnavis

शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारेही वाहू शकतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.CM Devendra Fadnavis



नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजानुसार दर तीन तासांनी एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात येत आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पावसाचा जोर अधिक असून नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी कंबरेइतके पाणी साचल्याचे चित्र आहे. दुपारी समुद्राला भरती असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवार, ४ जुलै रोजी मुंबईतील सर्व महानगरपालिका तसेच संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सकाळच्या सत्रात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Heavy Rain Alert Across Maharashtra; CM Devendra Fadnavis Urges Citizens to Stay Vigilant

महत्वाच्या बातम्या