विशेष प्रतिनिधी
सातारा: Heavy Rain Alert भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर व्यापक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.Heavy Rain Alert
पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन तसेच संपर्क व्यवस्था खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. या भागांतील नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.Heavy Rain Alert
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या परिसरात नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून, अपघातप्रवण ठिकाणी “प्रवेश निषिद्ध” आणि “धोकादायक क्षेत्र” असे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रमुख पर्यटनस्थळांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दरडप्रवण भागांतील नागरिक तसेच मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
स्थलांतरितांसाठी शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे आणि इतर तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक यंत्रणेला देण्यात आले आहेत.
अतिवृष्टीदरम्यान घाटरस्त्यांवरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, ओढे, नाले किंवा नद्यांना पूर आल्यास तसेच पुलांवरून पाणी वाहत असल्यास संबंधित मार्ग तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. अशा ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलीस आणि होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.
हवामानाचा अंदाज, धरणांमधील विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीपातळीबाबतची माहिती सोशल मीडिया, दवंडी, स्थानिक प्रसारमाध्यमे आणि व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय सर्व तहसील कार्यालये, नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवावेत तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Heavy Rain Alert in Satara: Entry Banned at High-Risk Tourist Spots, Evacuation Orders Issued
महत्वाच्या बातम्या