अजितदादांच्या जयंतीदिनी हाेणार शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या (22 जुलै) जाहीर हाेणार असून 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यात शेतकरी कर्जमाफीला सुरूवात हाेणार आहे.

पत्रकारांशी बाेलताना भरणे म्हणाले की, कर्जमाफीला विलंब होण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती. सुरुवातीला 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांना राज्यपालांची मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्यानंतर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची अंतिम माहिती केंद्र सरकारकडून मिळणेही गरजेचे होते. आता हा डेटा सरकारकडे प्राप्त झाला असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.



भरणे म्हणाले की, आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे यादी अंतिम करण्यात अडचणी येत होत्या. एखाद्या अपात्र शेतकऱ्याला लाभ देऊन नंतर तो थांबवण्यापेक्षा सुरुवातीपासूनच पात्र लाभार्थींची अचूक यादी तयार करण्यावर सरकारने भर दिला. आता केंद्र सरकारकडून आवश्यक माहिती मिळाल्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील सर्व प्रमुख अडथळे दूर झाले आहेत.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले की, 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

खरीप हंगामात बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत राज्यभरातून 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 8,192 प्रकरणांची तपासणी करण्यात आली असून 7,422 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत 763 नमुने निकृष्ट किंवा अमान्य आढळले असून संबंधित 81 कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दोषी कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे. सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत सर्वाधिक तक्रारी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतून प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणांमुळे 1 लाख 63 हजार 851 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे भरणे यांनी सांगितले.

Farm loan waiver list to be released on Ajit Pawar’s birthday

महत्वाच्या बातम्या