विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Kejriwal नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलकांवरील कथित लाठीचार्जाच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील तरुण चिंतेत असून सरकारने त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पेपरफुटी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना वाचवत असल्याचा गंभीर आरोपही केजरीवाल यांनी केला.Kejriwal
दिल्लीतील जंतर-मंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दिला. त्यानंतर देशातील विविध राज्यांतून हजारो विद्यार्थी दिल्लीत दाखल झाल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली.Kejriwal
सोमवारी, 20 जुलै रोजी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थी आंदोलकांना पोलिसांनी रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून अनेक विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, संजय राऊत आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. बैठकीत विद्यार्थी आंदोलन, पेपरफुटी, केंद्र सरकारची भूमिका आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, देशातील तरुणांच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आंदोलनस्थळी रात्रभर विद्यार्थी थांबले होते आणि देशातील विविध राज्यांतून तरुण दिल्लीत आले आहेत. वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून त्यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारला प्रश्न विचारणाऱ्या 18 ते 22 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांवर निर्दयीपणे लाठीमार करण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. हे विद्यार्थी देशाचे नागरिक आणि भविष्यातील आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशी गुन्हेगारांसारखी वागणूक देणे अत्यंत चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी, असा सल्लाही केजरीवाल यांनी दिला. युवकांमधील असंतोष दुर्लक्षित केल्यास सरकारविरोधातील रोष आणखी वाढेल, असा इशारा त्यांनी दिला.
केजरीवाल यांनी 2024 मधील कथित नीट पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख केला. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधाराविरोधात केंद्र सरकारने वेळेत आरोपपत्र दाखल केले नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळाल्याचा दावा त्यांनी केला. पेपरफुटी करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असताना सरकार कठोर कारवाईचे दावे करत असल्याची टीका त्यांनी केली.
“पेपरफुटी करणारे मोकाट फिरत आहेत, विद्यार्थ्यांवर मात्र लाठीमार केला जात आहे. सरकारने किमान जबाबदारी स्वीकारावी,” असे केजरीवाल म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा का दिलेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आम आदमी पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. देशातील इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, विरोधी पक्षांकडून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा वाढत असताना केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पेपरफुटीची स्वतंत्र चौकशी आणि आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
Kejriwal backs student protest, demands Dharmendra Pradhan’s resignation
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!