विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित पोलिसी कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले आहेत. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत रविवार, २६ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.Thackeray
हा मोर्चा दादर येथील शिवाजी पार्कमधून सुरू होऊन श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. विद्यार्थी, पालक, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही पक्षांकडून करण्यात आले आहे. मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असेल, मात्र तो सरकारला जनतेचा संताप दाखवणारे मोठे शक्तिप्रदर्शन ठरेल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.Thackeray
राज ठाकरे म्हणाले की, देशभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकण्यात आला, त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि लाठीमार करण्यात आल्याचे आरोप समोर आले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रूधूर आणि लाठीचा वापर केल्याच्या वृत्तानंतर देशातील विविध शहरांमध्ये निषेध आंदोलनांना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननेही विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध करत चौकशीची मागणी केली आहे. “विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून प्रश्न सुटणार नाहीत. त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे राज ठाकरे म्हणाले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज ठाकरे यांनी भाजपला त्यांच्या विरोधी पक्षातील भूमिकेची आठवण करून दिली. एखाद्या विभागात गंभीर अपयश आले, तर संबंधित मंत्र्याने नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांची मागणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापुरती मर्यादित होती. मात्र, आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईमुळे हा संघर्ष आता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्याचे राज ठाकरे म्हणाले.
आंदोलनाच्या पहिल्याच टप्प्यात सरकारने विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा केली असती, तर परिस्थिती चिघळली नसती, असे राज ठाकरे यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन, मणिपूरमधील हिंसाचार आणि आदिवासींच्या प्रश्नांवरही सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.
नीटसारख्या केंद्रीकृत परीक्षांना आपण सुरुवातीपासून विरोध केला होता, असा दावा करत राज ठाकरे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय एका परीक्षेतील गैरव्यवस्थेमुळे होणार असेल, तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.”
उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला केवळ परीक्षा किंवा पेपरफुटीच्या चौकटीत पाहू नये, असे सांगितले. गेल्या काही वर्षांतील विविध सरकारी निर्णयांमुळे नागरिकांमध्ये असंतोष साचला असून विद्यार्थ्यांचे आंदोलन त्याच असंतोषाचे व्यापक रूप आहे. हा केवळ नीटचा किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न राहिलेला नाही. पालक, बेरोजगार युवक आणि सरकारी व्यवस्थेमुळे त्रस्त असलेले नागरिकही यात सहभागी होत आहेत.
दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींनी पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याची माहिती दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. विद्यार्थिनींचे कपडे फाडण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि अत्यंत क्रूरपणे वागवण्यात आल्याचे आरोप त्यांनी केले.
सोशल मीडिया संदेशांऐवजी प्रत्यक्ष संवाद साधा’
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर संदेश देण्याऐवजी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. “ही आपल्या देशातील मुले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यात कोणताही कमीपणा नाही. पहिल्याच दिवशी संवाद झाला असता तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते,” असे ते म्हणाले.
पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने विविध शहरांमध्ये आंदोलन केले, तर दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला.
मोर्चाला बदनाम करण्यासाठी किंवा वेगळे वळण देण्यासाठी काही घटक प्रयत्न करू शकतात, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. कार्यकर्त्यांनी कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये आणि शांततेत मोर्चा पूर्ण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
Thackeray cousins unite over student protests; joint peaceful march from Shivaji Park to Siddhivinayak on July 26
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!

