विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: एक देश, एक निवडणूक’ घटनादुरुस्ती (One Nation One Election Bill) आज लोकसभेत सादर होणार आहे. देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती 17 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडली जाणार आहे. याचसंदर्भात सत्ताधारी पक्षांकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना ‘थ्री लाईन व्हीप’ बजावला आहे. सर्वांनी मंगळवारी लोकसभेत हजर रहायचं असल्याचं भाजपाकडून खासदारांना सांगण्यात आलं आहे. लोकसभेमध्ये, ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक मंजुरासाठी पटलावर ठेवल जाणार आहे. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत.
सरकारच्या विधेयकाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध करण्याची योजना आखली आहे. गेल्या गुरुवारी, मोदी सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आणि भारतात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या कायद्याशी संबंधित विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलं होतं. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळानं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली होती.




















